तुनिषा शर्मा हिला उर्दू शिकवले, हिजाब घालायला लावले | पुढारी

तुनिषा शर्मा हिला उर्दू शिकवले, हिजाब घालायला लावले

मुंबई, वृत्तसंस्था : शिझानने तुनिषाला जाळ्यात अडकवले होते. तो आणि त्याचे कुटुंबीय तिला ब्लॅकमेल करायचे, तसेच तुनिषाला त्यांनी उर्दूही शिकायला लावले, हिजाब वापरायला लावले, असा आरोप तुनिषा शर्मा हिच्या आईने केला आहे.

24 डिसेंबर रोजी ‘अलीबाबा दास्तान ए काबूल’ या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड असलेल्या अभिनेता शिझान खान याला अटकही करण्यात आली होती. तो सध्या कोठडीत असून त्याने आपला तुनिषासोबत ब्रेक अप झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, तुनिषाची आई वनिता शर्मा, वडील पवन शर्मा आणि त्यांचा ड्रायव्हर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना वनिता शर्मा यांनी सनसनाटी आरोप केले. त्या म्हणाल्या की, शिझानने ब्रेकअप केल्यानंतर आपण दुसर्‍या कुण्या मुलीसोबत आहोत का हे स्पष्टच सांगायला हवे होते. आम्ही त्याला विचारले देखील होते, पण त्याने तसे काही नाही असे सांगितले. पण तुनिषाला शिझानने आपल्या जाळ्यात ओढले होते हे नक्की असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, त्याच्यासोबत राहून तुनिषा उर्दूही शिकली व बोलायलाही लागली होती.

शिझान आणि त्याचे कुटुंबीय तुनिषाला ब्लॅकमेल करत होते, असेही त्या म्हणाल्या. ती जसजशी शिझान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या जवळ गेली तसतशी आमच्यापासून तुटतच गेली. आपण तिला शिझानसोबतच्या नात्याबाबत अनेकदा विचारणा केली पण ती काहीच बोलायची नाही. ती हिजाबही वापरायला लागली होती, असेही तुनिषाची आई म्हणाली. दरम्यान, पोलिसांनी शिझान आणि तुनिषा यांच्यातील चॅटची 250 पाने मिळवली असून त्याची छाननी सुरू आहे. दुसरीकडे शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईलमधील डिलिट केलेले चॅट परत मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे.

त्या दिवशी काय घडले हे कळायलाच हवे

तुनिषाची आई म्हणाली, माझी मुलगी आत्महत्या करणार्‍यांपैकी नाही. त्यामुळे त्या दिवशी असे काय घडले ते समोर यायला हवे. माझ्याशी ती फोनवर व्यवस्थित बोलली आणि अर्ध्या तासात तिने आत्महत्या केली, हे कितीही विचार केला तरी पटूच शकत नाही.

Back to top button