गुगलवरील क्रेड ॲपचा कस्टमर केअर क्रमांक पडला महागात | पुढारी

गुगलवरील क्रेड ॲपचा कस्टमर केअर क्रमांक पडला महागात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुगलवर क्रेड  ॲपच्या कस्टमर केअरचा क्रमांक शोधून त्यावर कॉल करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगाने क्रेड ॲपच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत या तरुणाच्या क्रेडीट कार्डवरुन ०१ लाख रुपये लंपास केले आहेत. या ऑनलाईन सायबर फसवणूकीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गोवंडीमध्ये राहाणारे जावेद (४०) हे एका मोबाईल कंपनीत नोकरी करतात. २४ डिसेंबरला त्यांंना एका मित्राला १० हजार रुपये पाठवायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या क्रेडीट कार्डचा वापर करत मोबाईलमधील क्रेड ॲपच्या माध्यमातून पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे जात नव्हते. अखेर त्यांनी गुगलवर क्रेड ॲपचा कस्टमर केअर नंबर शोधला. मिळालेल्या नंबरवर काॅल करुन त्यांनी घडलेली घटना सांगितली. त्यावर समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना व्हाॅटस् ॲपवर एक लिंक पाठविली. या लिंकवर जाऊन एक फाईल डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार जावेद यांनी लिंकच्या माध्यमातून कस्टमर सपोर्ट १ हे ॲप डाऊनलोड केले.

डाऊनलोड केलेल्या ॲपवर एक कोड आला. त्या व्यक्तीने हा कोड मागून घेत त्यांना आणखी एक लिंक पाठविली. त्यानंतर जावेद यांना मोबाईलमध्ये क्रेडीट कार्डचा फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच क्रेडीट कार्डवरुन तिन व्यवहार होत ०१ लाख १३६ रुपये वजा झाले. त्यानंतर मात्र आपली फसवणूक होत असल्याची जावेद यांची खात्री पटली. त्यांनी बॅंकेत धाव घेत डिस्प्युट अर्ज भरुन देत गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

.हेही वाचा

Back to top button