मुंबईत जप्त केलेल्या प्लास्टिकपासून बाकड्यांची निर्मिती | पुढारी

मुंबईत जप्त केलेल्या प्लास्टिकपासून बाकड्यांची निर्मिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महानगरपालिकेने गेल्या सहा महिन्यात ३९९१ किलो प्लास्टिक जप्त केले. जप्त केलेल्या प्लास्टिकचा यापुढे लिलाव न करता प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकपासून उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवण्याचा विचार पालिकेचा आहे. पहिल्या टप्प्यात उद्यान व ऑफिसमध्ये प्लास्टिकचे बाकडे तयार करण्यात येणार आहेत.

मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आल्यानंतरही त्याचा दुकानदारांकडून वापर सुरू आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर महापालिकेकडून सातत्याने कारवाई करत आहे. जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत महापालिकेने ठिकठिकाणी कारवाई करत ३९९१ किलो प्लास्टिक जप्त केले. मुंबईतील भाजी विक्रेत्यांकडून सर्वाधिक प्लास्टिकचा वापर होत असल्याचे सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. त्यांच्यावर बंदीचा काही परिणाम झालेला दिसत नसल्याचे महापालिकेचे उपायुक्त संजोग काबरे यांनी सांगितले. प्लास्टिक पिशव्या वापरू नये असे सांगूनही प्लास्टिक पिशव्या वापरत असलेल्या ७७६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ३८ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेने जप्त केलेले प्लास्टिक गोदामात जास्त काळ ठेवू शकत नाही. त्यामुळेच प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करायचा यावर अभ्यास सुरू आहे.

  • बाहेरून आणले जाणारे प्लास्टिक रोखण्यासाठी महापालिकेकडे कोणतेही यंत्रणा नाही. मुंबईतील प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिस, रेल्वे आणि वाहतूक विभागाकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांच्या सहकार्यानेच प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालता येईल, असेही कबरे यांनी सांगितले.

Back to top button