मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आले पुन्हा मास्क ! | पुढारी

मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आले पुन्हा मास्क !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना चीनमध्ये ज्या पद्धत्तीने वाढतोय, त्याचा धसका सर्व जगाने घेतला आहे. मुंबईकरही आता खबरदारी म्हणून बाहेर पडताना मास्क वापरताना दिसू लागले आहेत. ‘… जिंकून कोरोनाशी युद्ध आपले आयुष्य बहरेल’ च्या उद्घोषणा उपनगरीय लोकलमध्ये पुन्हा ऐकू येऊ लागल्याने अनेक रेल्वे प्रवाशांच्या तोंडावर मास्क आला आहे. मास्कसक्ती नसली, तरी मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, सिद्धिविनायक सारख्या मोठ्या मंदिराच्या ट्रस्टीनी दर्शनासाठी येतान खबरदारी घेण्याचे अवाहन केले आहे.

शहरात दिवसाला सरासरी पाच ते सहा रुग्ण आढळू लागले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या सरासरी ५० इतकी आहे. केवळ दहा रुग्ण सध्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेनेही जय्यत तयारी केली आहे. ३४ हॉस्पिटलसह २१२४ विलगीकरण खाटा, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १६१३ आणि अतिदक्षता विभागातील ५७९ खाटा शहरात तयार ठेवण्यात आल्या आहेत. रेमडीसीवीर, टॉसीलोझुम्याब, मिथाईलप्रेडनिसोलोन, डेक्सामेथाझोन, अँफोटेरीसिन बी, पॉस्कोनयाझोल इत्यादींचा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या दोन लाटांमध्ये होरपळलेल्या मुंबईकरांनी प्रसारमाध्यमांवर चीनमधील दृश्य पाहून स्वतःहून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. सरकारी आदेशावर अवलंबून न राहाता मुंबईकर स्वतःहून हळूहळू मास्ककडे वळू लागले आहेत. मेडिकल स्टोअसमध्येही मास्क खरेदी कारतानाचे चित्र पहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे मुंबईत सध्य सर्दी खोकल्याची साथ असल्याने काहींनी मास्क वापरण्यास सुरूवात केली आहे. अनुकताच झालेला ख्रिसमस आणि येऊ घातलेला नववर्षाचा उत्सव यामुळे शासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

नवी मुंबईकर स्वतःहून घेत आहेत खबरदारी

सध्या चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्याने देश तसेच राज्याचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. परंतु, अद्यापही करोना संदर्भात पालिका व राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत. मात्र समाज माध्यमातून कोरोना संसर्ग वाढल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिक स्वतःहून कोरोनाच्या बचावासाठी मास्क लावण्यास सुरुवात केली आहे.

विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, बस, रेल्वे मध्ये प्रवासी संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क लावत आहे. शहरातील बसस्टॅण्ड, ट्रान्स हार्बर लोकलमधून प्रवास करताना नागरिक स्वतःहून मास्क वापरत आहेत. तसेच सॅनिटायझरचा देखील वापर केला जात आहे. कोरोनाच्या नव्या विषाणुबाबत विमानतळावर प्रवाशांच्या नियमावली लागू झाल्या आहेत. अशातच रेल्वे प्रवाशांनी स्वयंशिस्त दाखवत मास्क घालून प्रवास सुरू केला आहे. लोकलमध्ये सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत. अनेक प्रवासी मास्क लावून वावरताना दिसत आहेत.

Back to top button