ठाकरे गटाला धक्का, योगेश भोईर यांना खंडणीप्रकरणी अटक | पुढारी

ठाकरे गटाला धक्का, योगेश भोईर यांना खंडणीप्रकरणी अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तथा कांदिवली उपविभागप्रमुख योगेश भोईर यांना मंगळवारी रात्री कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्यावर खंडणीसह जिवे मारण्याची धमकी देणे आणि सावकरी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत बुधवारी त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कांदिवलीतील एका विकासकाला दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गेल्या कलमांतर्गत महिन्यात भीमसेन यादव याला दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. या गुन्ह्यात पहिल्यांदा योगेश भोईर यांचे नाव समोर आले होते. अटकेच्या भीतीने भोईर यांनी विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला होता.
याच गुन्ह्यात नंतर त्यांची दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. भोईरविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात अशाच एका खंडणीसह जिवे मारण्याची धमकी देणे आणि सावकरी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास कांदिवली युनिटकडे होता. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी दहिसर युनिटमधून योगेश भोईर हे कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांची संबंधित गुन्ह्यात पोलिसांनी चौकशी केली. तीन तासांच्या या चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर रात्री योगेश भोईर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी किल्ला न्यायालयात हजर केले जाणार असून जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Back to top button