सीमाप्रश्नी आज ठराव; फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही | पुढारी

सीमाप्रश्नी आज ठराव; फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही. महाराष्ट्र सीमावासीयांच्या मागे ठामपणे उभे राहील. कर्नाटक इंच इंच जागेसाठी लढणार म्हणत असेल तर आम्ही देखील इंच इंच जागेसाठी लढू, सीमा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात ज जे करावे लागेल ते सर्व करू, सीमा प्रश्नावर राज्य सरकार मंगळवारी ठराव मांडणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

कर्नाटक सरकारने त्यांच्या विधिमंडळात महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केला. मात्र राज्य सरकारने अद्याप सीमा प्रश्नावर ठराव आणला नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी विधानसभेत ठराव आणण्याची मागणी यानंतर सर्वच विरोधकांनी केली. सर्व कामकाज बाजूला ठेवून हा ठराव मांडावा, असे अजित पवार म्हणाले.

अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला तरीही सीमाप्रश्नी ठराव मांडला नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण महाराष्ट्र सरकार गप्प बसले आहे. सोमवारी हा ठराव यायलाच हवा होता. पण तो कामकाजात आणला गेला नाही, असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या मागणीला पाठिंबा दिला. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने हा मुद्दा जाणीवपूर्वक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सतत मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. अशावेळी आपण केवळ बघ्याची भूमिका घेता कामा नये,
असे ते म्हणाले.

Back to top button