एसटीचे 35 लाख प्रवासी दुरावले; एक हजार कोटींची तूट | पुढारी

एसटीचे 35 लाख प्रवासी दुरावले; एक हजार कोटींची तूट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संक्रमण घटले, कर्मचार्‍यांचा संप मिटून आठ महिने झाले, सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले, तरी एसटी महामंडळाचे प्रवासी गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनापूर्वी राज्यभरात एसटीने दररोज 60 ते 62 लाख प्रवासी प्रवास करीत होते. परंतु सध्या एसटीतून केवळ 25 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. म्हणजेच आजही सुमारे 35 लाख प्रवासी एसटीपासून लांब आहेत. त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी झाला आणि गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचार्‍यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू झाला. तब्बल सहा महिने चाललेला संप एप्रिल 2022 मध्ये मिटला. त्यानंतर एसटीची प्रवासी वाहतुक सुरू झाली. परंतु एसटीकडे प्रवासी काही वळले नाहीत. प्रवासी मिळविण्यासाठी महामंडळाने देखील काही विशेष प्रयत्न केले नाहीत. महामंडळाकडे सध्या गाड्यांची कमतरता आहे. अनेक गाड्या नादुरुस्त असल्याने त्या डेपोतच उभ्या आहेत. त्यातच ज्या गाड्या रत्यावर धावत आहेत, त्या अतिशय अस्वच्छ आहेत. तसेच महामंडळाचे तिकीट जास्त असल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास येते.

एक हजार कोटींची तूट

कर्मचार्‍यांचे वेतन, गाड्यांचे सुट्टे भाग, इंधन याकरिता महामंडळाला महिन्याला 700 कोटी रुपये लागतात. सध्या प्रवासी वाहतुकीतून महिन्याला सुमारे पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपये उत्पन्न मिळते. महामंडळाला यंदाच्या वर्षात एक हजार कोटींची तूट निर्माण झाली आहे. कंत्राटदारांची दोन हजार कोटींची देणी थकली आहेत.

Back to top button