सीमाप्रश्नी आज विधिमंडळात ठराव येण्याची शक्यता | पुढारी

सीमाप्रश्नी आज विधिमंडळात ठराव येण्याची शक्यता

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सीमा प्रश्नावर कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव केला असताना शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्र विधिमंडळात सोमवारी याबाबतचा ठराव आणणार आहे. कामकाज सल्लागार समितीत सीमावासीय मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या पेटला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणती भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे. अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत हिवाळी अधिवेशनात ठराव आणण्याचा निर्णय झाला होता. मात्र पहिल्या आठवड्यात तरी हा ठराव मांडण्यात आला नाही. आता सोमवारी हा ठराव आणण्यास भाग पाडू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.

अधिवेशनानंतर पुन्हा दिल्लीला जाणार

सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत नुकतीच बैठक घेतली होती. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते. आता राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याचे राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिंदे आणि फडणवीस पुन्हा एकदा केंद्रीय नेत्यांना भेटून या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले.

Back to top button