नवनीत राणांच्या मागे न्यायालयाचा ससेमिरा; वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश | पुढारी

नवनीत राणांच्या मागे न्यायालयाचा ससेमिरा; वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत सापडलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त करण्यास नकार देत झटका दिला. त्यानंतर आता शिवडी कनिष्ठ न्यायालयाने जामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देत सुनावणी २७ डिसेंबरला निश्चित केली. यामुळे नवनीत राणा यांना न्यायालयाच्या ससेमिऱ्याला समोरे जावे लागणार आहे.

नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या, तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली. मात्र त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करून मिळवल्याचे आढळून आले. त्यानंतर नवनीत राणा व त्यांचे वडील हरभजन सिंग राम सिंग कुंडलेस यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिनाभरात दुसऱ्यांदा वॉरंट बजावले. त्या विरोधात राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. ती कालच सत्र न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी फेटाळून लावली. त्यामुळे राणा यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणात आपण दोषमुक्त होऊ असा त्यांना विश्वास होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. दरम्यान गुरुवारी कनिष्ठ न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. यापूर्वी मुलुंड पोलिसांना जामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २७ डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

Back to top button