देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

आघाडीच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो; आघाडीचा हा नॅनो मोर्चा : देवेंद्र फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही ते महाविकास आघाडीचे नेते कसल्या वल्गना करत आहेत? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राहणार आणि पुन्हा आमचेच सरकार येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आघाडीचा मोर्चा हा अयशस्वी झाला असून हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे नॅनो मोर्चा होता, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. जे लोक देवी-देवता आणि वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा आजचा हा नॅनो मोर्चा होता, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे, तसा हा मोर्चा होता, महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान कुणीच करू नये आणि कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. मुद्दे संपले की अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला वाद नाही हे मविआतील हे तीन पक्ष विसरले आहेत. तो वर्षानुवर्षे सुरू आहे. सीमाप्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. कारण काँग्रेस पक्षाने सीमाप्रश्न निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आराध्य कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.

या मोर्चात तीन पक्ष एकत्र येऊन 'ड्रोन शॉट' दाखविता आले नाहीत, तुम्हाला 'क्लोज शॉट' दाखवावे लागले. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदान घ्या; पण त्यांनी मुद्दाम एका निमुळत्या जागेची मागणी केली आणि तेथे त्यांनी मोर्चा काढला. राहुल गांधी आणि पाकिस्तान एकाच दिवशी कसे बोलतात, हाच मला पडलेला प्रश्न पडला आहे. त्यांची राष्ट्राच्या प्रती संवेदना काय आहे, हे यातून लक्षात येते, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, पैसे देऊनही त्यांना माणसे जमवता आली नाही, अशी खिल्ली त्यांनी नागपुरात बोलताना उडवली.

ठाकरेंची कॅसेट 10 वर्षार्ंपासून अडकलेली

उद्धव ठाकरेंनी मुंबई तोडण्याच्या केलेल्या आरोपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांची कॅसेट वारंवार तेथेच अडकते. ती गेल्या 10 वर्षांपासून तेथेच अडकली आहे. त्यांनी स्क्रिप्टसाठी काही नवीन लोक नेमावेत. नवीन मुद्दे द्यावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे. मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. कारण भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे. पण त्यांना सांगायला दुसरे मुद्देच नाहीत, अशी टीका त्यांनी ठाकरेेंवर केली.

logo
Pudhari News
pudhari.news