Amol Mitkari : “आम्ही प्राण्यांना दुसरा मोर्चा काढायला सांगितला आहे”, मिटकरींचा भाजपावर निशाणा  | पुढारी

Amol Mitkari : "आम्ही प्राण्यांना दुसरा मोर्चा काढायला सांगितला आहे", मिटकरींचा भाजपावर निशाणा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : “प्राण्यांना मोर्चात नेता येणार नाही अशी अट महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला घातल्याने आम्ही प्राण्यांना दुसरा मोर्चा काढायला सांगितला आहे.” असं खोचक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सत्तांतरानंतरचा विरोधकांचा पहिलाच एकत्रित मोर्चा

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच स्थित्यांतर आली. अलिकडे महाराष्ट्रातील वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यांवर आज मुंबईत महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हा मोर्चा काढला जात असून त्याने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. मुंबईत भायखळा ते आझाद मैदान (क्रुडास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत) असा महामोर्चाचा मार्ग असणार आहे. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा असेल.  तर भाजपकडूनही ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. शुक्रवारी पोलिसांनी काही अटी, शर्तीसह या मोर्चाला परवानगी दिली आहे.

काय आहेत मुंबई पोलिसांनी घातलेल्या अटी ?

महाविकास आघाडीने शिनवारी आयोजित केलेल्या महामोर्चाला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांनी १४ अटी घातल्या आहेत. त्या अशा-

  • मोर्चा शांततेने काढावा.
  • मोर्चामध्ये कुणीही प्रक्षोभक अथवा कुणाच्याही भावना दुखावतील, असे वक्तव्य करणार नाही किंवा घोषणा देणार नाही.
  • मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रे, लाठी, पुतळे वगैरे घेऊन जाण्यास मनाई असेल.
  • मोर्चामध्ये प्राण्यांचा वापर करण्यात येऊ नये.
  • कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेस बाधा येणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी.
  • बंदोबस्तावरील पोलिसांच्या कायदेशीर आदेशाचे पालन मोचनि करावे.
  • फटाके वगैरे वाजवण्यास मनाई.
  • वाहतुकीस अडथळा नको.
  • मोर्चा दिलेल्या मार्गावरूनच नेण्यात यावा.
  • मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.
  • मोर्चामध्ये वापरण्यात येणारी वाहने ही सुस्थितीमध्ये असावीत.
  • मोर्चादरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.
  • मोर्चादरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहन चालकांना त्रास होईल असे कृत्य करू नये.
  • कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहून पदयात्रेचा परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.

Amol Mitkari : प्राण्यांना दुसरा मोर्चा

महाविकास आघाडीन मुंबईत हल्लाबोल मोर्चाचं तर दुसरीकडे या महामोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपही माफी मांगो आंदोलन करणार आहे. तर मुंबई पोलिसांनी महामोर्चाला अटी घालत परवानगी दिली आहे. यात असलेली अट मोर्चामध्ये प्राण्यांचा वापर करण्यात येऊ नये. या अटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट करत भाजपला टोला मारला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे, “प्राण्यांना मोर्चात नेता येणार नाही अशी अट महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला घातल्याने आम्ही प्राण्यांना दुसरा मोर्चा काढायला सांगितला आहे.”

हेही वाचा

Back to top button