पोलीस दलात अखेर तृतीयपंथीयांची एन्ट्री | पुढारी

पोलीस दलात अखेर तृतीयपंथीयांची एन्ट्री

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना संधी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता राज्य पोलिसांनी पोलीस भरती २०२१ च्या https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करून दिली आहे. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज भरायला १३ डिसेंबरपासून हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. अर्ज सादर करण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले असल्याने तृतीयपंथींची दमछाक होणार आहे.

राज्य पोलीस दलातील प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी याबाबत एक पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. मात्र तृतीयपंथींसाठी ही पोलीस भरतीप्रक्रिया नेमकी कशी राबविण्यात येणार आहे, याची माहिती देण्यात आली नाही. पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथींसाठी महिलांसाठी असलेले निकष असतील का, याचीही स्पष्टता नाही. तसेच, त्यांची शारीरिक चाचणी कोणाकडून आणि कशी घेतली जाईल याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला नाही. त्यामुळे तृतीयपंथींच्या पोलीस भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रियेत स्थान मिळवण्यासाठी तृतीयपंथीयांच्या विविध संघटनांनी कायदेशीर प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर यावर्षी त्यांना यात मोठे यश मिळाले. राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना संधी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पोलीस भरतीत राज्यातील तृतीयपंथीयांना थेट सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनीही तृतीयपंथातील व्यक्तींसाठी पर्याय भरती प्रक्रियेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिला आहे.

Back to top button