समृद्धी महामार्गाचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण | पुढारी

समृद्धी महामार्गाचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी (दि. 11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौर्‍यावर येत असलेले पंतप्रधान मोदी मेट्रो ट्रेनमधूनही प्रवास करणार असून, समृद्धी महामार्गावरून प्रवासही करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्‍या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीची तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत आहे.

सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्‍या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. दरम्यान, उद्घाटन सोहळा कार्यक्रमस्थळाची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

…असा असेल पंतप्रधानांचा दौरा

मुख्य सचिवांनी 11 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज 1 चे उद्घाटन, वंदे मातरम् ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण, त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.

या काळात पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. झीरो माईल्स ते वायफळ टोल नाका असा प्रवासही करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button