मुंबई : मध्य रेल्वेचे ‘मिशन हिरवळ’ ! | पुढारी

मुंबई : मध्य रेल्वेचे 'मिशन हिरवळ' !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हरीत चळवळ सुरु केली आहे. रेल्वे ट्रॅकच्या देखभाल आणि सुशोभीकरणाच्या कामांना फ्लोरिकल्चरची जोड देण्यात आली आहे. मार्च – २०२३ अखेरीस ५० हजार रोपांची लागवड करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे.

मुंबई विभागाने फुलशेती आणि रेल्वे रुळांचे सुशोभीकरण यांचा मेळ घालण्याची अनोखी संकल्पना राबवली आहे. दर आठवड्याला मेगाब्लॉक दरम्यान नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते. या संकल्पनेत रुळांची साफसफाई करणे, रेल्वे रुळांवरील वनस्पती, कोरडे गवत आणि चिखल काढणे, माती आणि खताचे नूतनीकरण, नवीन रोपे लावणे आणि छाटणे, सध्याच्या वनस्पतींची छाटणी आणि पाणी देणे यांचा समावेश आहे. मेगाब्लॉक दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामांसह ही कामे एकाच वेळी केली जाणार आहेत.
१९ आणि २० नोव्हेंबर रोजी कर्नाक रोड ओव्हर पुलाच्या तोडकामावेळी शॅडो कामाचा एक भाग म्हणून या कामाचा बराचसा भाग यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा तसेच हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड येथे १२,००० हून अधिक रोपे लावण्यात आली.

  • वाडीबंदर येथे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आणि इगतपुरी येथील वनौषधी उद्यानात अंदाजे अनुक्रमे १२० आणि ४७० पेक्षा जास्त विविध प्रजातींच्या हर्बल वनस्पती आणि झुडुपे लावण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मियावाकी जंगल उभारण्यात आले आहे.

 

 

Back to top button