सीमाभागातील हालचाली गतिमान; राजकीय नेत्यांचे दौरे, पोलिस अधिकार्‍यांच्या बैठका | पुढारी

सीमाभागातील हालचाली गतिमान; राजकीय नेत्यांचे दौरे, पोलिस अधिकार्‍यांच्या बैठका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सीमावादाची सुनावणी आणि सीमाभागासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दि. 3 रोजी बेळगावला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील हालचाली वेगवान झाल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर गेले काही दिेवस सीमाभागातील वातावरण तापले होते. आता सुनावणीही होणार असल्यामुळे राजकीय पातळीवरील घडामोडींनाही वेग आला आहे.

आधी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर द्या; नंतर बाकी विषयांवर बोला ; छगन भुजबळ

नाशिक : महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या; नंतर बाकीच्या विषयांवर बोला, असे ठणकावून सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याचा भाग असल्याचे कर्नाटकमधील नेत्यांनी सांगणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’ असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कर्नाटकमधील नेत्यांकडून होत असल्याची टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, बेळगाव, कारवारसाठी जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ लढा सुरू आहे. हा केवळ देशातील नव्हे; तर जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेला लढा आहे. हा प्रश्न लवकर निकाली निघण्याची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येऊन हा लढा देण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही भुजबळ म्हणाले.

जत तालुक्यातील सिद्धनाथमध्ये पदयात्रा

वळसंग : जत तालुक्यातील तिकोंडी, उमराणी गावापाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. सिद्धनाथ महाराष्ट्रात असून येथे उच्च शिक्षणाची सोय नाही. भाषेची अडचण आहे. येथे कर्नाटक महामंडळाच्या चार बसेस तर महाराष्ट्राच्या दोन बस येतात. म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्नाटकचे ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरून बसवेश्वर चौकापर्यंत पदयात्रा काढली.

जतचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी : मुख्यमंत्री

जत : पाण्यापासून वंचित असणार्‍या जत तालुक्यातील 65 गावांसाठी विस्तारित योजना त्वरित मंजूर करावी. तसेच तालुक्यातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करावा, या मागण्यांसाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत आठवड्याभरात बैठक लावून जत तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

समन्वय मंत्र्यांच्या बेळगाव दौर्‍यावरून कन्नडिगांची कोल्हेकुई

बेळगाव : सीमाप्रश्नी सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई 3 डिसेंबर रोजी बेळगावात येत आहेत. त्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. हा दौरा रद्द करावा, अन्यथा धडा शिकवू, अशी कोल्हेकुई या संघटनांनी सुरू केली आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने बेळगावात येणार्‍या महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी न केल्यास त्यांना धडा शिकवावा लागेल, अशी कोल्हेकुई केली आहे. आणखी एका संघटनेने बेळगावात ज्या प्रकारे महाराष्ट्रातील दोन मंत्री येणार आहेत तशाच प्रकारे कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रात दोन मंत्र्यांना पाठवून जत, अक्कलकोट परिसरातील जनतेशी संवाद साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केले आहे.

   

Back to top button