

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीअंतर्गत तब्बल 39 हजार 613 विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांमधून प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागात 7 हजार 48 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून यामध्ये अल्पसंख्यांक कोट्यातून सर्वाधिक 4 हजार 182 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून इन-हाऊस कोट्यातून 2 हजार 690 तर व्यवस्थापन कोट्यातून मात्र केवळ 176 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
अकरावीच्या प्रवेशात यंदा राज्यातील 9 हजार 263 कनिष्ठ महाविद्यालये असून 20 लाख 30 हजार 333 इतक्या जागा आहेत. त्यापैकी 16 लाख 10 हजार 293 जागा कॅप फेरीसाठी तर 4 लाख 59 हजार 653 जागा विविध कोट्यांसाठी राखीव आहेत. या जागांसाठी आतापर्यंत 9 लाख 54 हजार 867 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नियमित फेरी अगोदर शून्य फेरीमध्ये विद्यार्थ्यांना इन-हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत प्रवेश निश्चित करण्यासाठी 18 व 19 मेदरम्यान संधी देण्यात आली होती. या कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घेतले आहेत. या शून्य फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित प्रवेश फेऱ्यांमधून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोटानिहाय पाहता इन-हाऊस कोट्यातून सर्वाधिक 21 हजार 738 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अल्पसंख्यांक कोट्यातून 13 हजार 137 आणि व्यवस्थापन कोट्यातून 4 हजार 738 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.