शिल्पा शेट्टी म्हणते, नवर्‍याचे उद्योग माहीत नव्हते | पुढारी

शिल्पा शेट्टी म्हणते, नवर्‍याचे उद्योग माहीत नव्हते

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कामात व्यग्र असल्याने पती राज कुंद्रा काय करत होता, याची कसलीही कल्पना आपल्याला नव्हती असा जबाब शिल्पा शेट्टी हीने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला आहे. परिणामी नवर्‍याविरूद्धच्या खटल्यात शिल्पाला साक्षीदार म्हणून उभे राहावे लागेल.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी 1500 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात शिल्पा शेट्टी च्या साक्षीचाही समावेश आहे. ज्या अ‍ॅपवरून राज कुंद्राने अश्लील चित्रफित प्रसारित केल्या त्या हॉटशॉट आणि बॉलिफेम अ‍ॅपबाबत देखील आपल्याला कसलीही कल्पना नव्हती, असेही शिल्पाने जबाबात म्हटले आहे.

राज कुंद्राने पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी हॉटशॉट मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले. ते नंतर लंडन येथील केनरीन कंपनीला विकण्यात आले. या अ‍ॅप्लिकेशनची तांत्रिक कामे राज कुंद्राने करवून घेतली होती.

त्यामुळे राज कुंद्रा हाच पॉर्न चित्रफित प्रसारणातला मुख्य सूत्रधार असल्याचे इलेक्ट्रॉनिक पुरावे मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. अश्लील मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही पोलिसांनी अटक केली होती.

राज कुंद्राने 2015मध्ये विआन इंडस्ट्रिज ली. नावाने कंपनी सुरू केली. त्या कंपनीत आपले 24.50 टक्के समभाग होते. एप्रिल 2015 ते जुलै 2020 या काळात मी या कंपनीत संचालकपदावर कार्यरत होते. त्यानंतर व्यक्तिगत कारणावरून आपण संचालकपदाचा राजीनामा दिल्याचेही शिल्पाने नमूद केले.

Back to top button