फ्रीज भरून खोके कुठे गेले, त्याची चौकशी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

फ्रीज भरून खोके कुठे गेले, त्याची चौकशी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांची मानसिकता ढळली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आलेल्या नैराश्येपोटी ते आमच्यावर टीका करत आहेत, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. ‘मातोश्री’वर फ्रीज भरून नव्हे, तर कंटेनर भरून खोके गेले. कुठे कुठे खोके गेले ते मी आता तपासणार आहे, असा गर्भित इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

आपला दोन दिवसांचा गुवाहाटी दौरा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकारी खासदार, आमदारांसह रविवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाले. गुवाहाटी सोडण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केलेल्या टीकेवर त्यांनी पलटवार केला. उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या सभेत शिंदे गटाच्या गुवाहाटी दौर्‍यावर टीका करताना ज्याला स्वतःचे भविष्य माहिती नाही, ते आमचे भविष्य ठरविणार का? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच पुन्हा एकदा खोक्यांची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढळला आहे. त्यांना एवढ्या लवकर नैराश्य येईल असे वाटले नव्हते. पण ते लवकरच आले. त्यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याने त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यातून ते अशी टीका करू लागले आहेत. पण त्यांनी आमच्यावर टीका करण्याआधी स्वतः आत्मचिंतन करावे.

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फ्रीजमध्ये भरून ‘मातोश्री’वर खोके गेले असल्याचा आरोप केला होता. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपाची मला चौकशी केली पाहिजे. फ्रीजमध्ये भरून की कंटेनरमध्ये भरून खोके गेले, याचा शोध मी आता घेणार आहे, असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या इशार्‍याने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी दुपारी गुवाहाटीला पोहोचलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. कामाख्या देवीची पूजाअर्चा करून नवस फेडल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांची भेट घेत त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले. शर्मा यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Back to top button