पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा (Balasaheb Thackeray Smrutidin) स्मृतिदिन. २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे म्हणजेचं केशव सीताराम ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वळण दिलं. लोकांनी त्यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे 'हिंदूहृदय सम्राट' अशी उपाधी दिली. ते चांगले व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्राच्या फटकाऱ्यातून त्यांनी राजकीय घटनांवर परखडपणे भाष्य केले; पण तुम्हाला माहित आहे का.? बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घेणार होते; पण त्यांचा प्रवेश घेण स्थगित झालं. वाचा नेमका काय आहे हा किस्सा.
Balasaheb Thackeray Smrutidin बाळासाहेबांनी अगदी लहान वयात हातात कुंचला पकडला. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांनी व्यंगचित्राचे पहिले धडे गिरवले. मात्र त्यांच्यावर दीनानाथ दलाल व डेव्हिड लो या महान व्यंगचित्रकारांचा प्रभाव होता.
बाळासाहेब म्हणतात, आज आम्ही जे काही आहोत ते व्यंगचित्र कलेमुळेच आहोत. आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात व समाजात आम्ही ज्या शिखरावर जाऊन पोहोचलो आहोत ते आम्हाला कधीच गाठता आले नसते. व्यंगचित्रांसाठी हात आणि डोळे सशक्त असावे लागतात. व्यंगचित्रकार म्हणून खास ओळख असलेल्या बाळासाहेबांनी कधी व्यंगचित्र काढण्याच शिक्षण घेतलं नव्हतं. त्यांच्या व्यंगचित्राच श्रेय ते प्रबोधनकार आणि कोल्हापूरच्या बाबुराव पेंटरना देतात. बाकी इतरांकडूनही शिकलो हेही सांगतात ते.
बाळासाहेबांना लोक विचारत,व्यंगचित्र शिकण्यासाठी तुम्ही कुठल्या 'स्कूल'मध्ये गेलात?' तेव्हा ते त्यांना सांगायचे, "मी कुठल्याच स्कूलमध्ये गेलो नाही. गेलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. बिघडला असता माझा हात." याचे श्रेय ते कोल्हापूरच्या बाबूराव पेंटरना (Baburao Krishnarao Mestry) देतात. ते सांगतात, बाबुराव पेंटरांनी मला आर्ट स्कूलला जाण्यापासून वाचवलं. त्याचा किस्सा असा आहे की, एकदा बाबूराव पेंटर बाळासाहेबांच्या दादरच्या घरी आले होते. घरी ते शतपावली घालत होते. त्यावेळी त्यांनी भिंतीवर लावलेलं एक पेंटिंग पाहिलं. ते पेंटिंग त्यांना आवडलं. प्रबोधनकारांना म्हणजे बाळासाहेबांचे वडिलांना पेंटरांनी विचारलं."कोणी काढलंय?" "बाळनं काढलंय" अस प्रबोधनकारांनी सांगितल्यावर त्यांनी बाळासाहेबांना बोलावून घेतलं आणि विचारलं "काय करतोस? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "मी उद्यापासून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट जाणार आहे."
जे. जे. स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घेतला होता. साठ रुपये फी भरून झाली होती. रंग, ब्रश वगैरे आणून सगळी तयारी झाली होती. ते ऐकून बाबूराव प्रबोधनकारांना म्हणाले, "अरे, या पोराचा हात चांगला आहे. स्कूल ऑफ आर्टस मध्ये त्याला पाठवून तो फुकट घालवू नको! पाहिजे तर त्याला मी कोल्हापूरला घेऊन जातो आणि चांगला आर्टिस्ट तयार करतो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्कूल ऑफ आर्टस्ला गेले नाहीत. 'फटकारे'मध्ये बाळासाहेब लिहतात "मी जे जे स्कूल ऑफ आर्टस गेलो नाही. साठ रुपये फुकट गेले, पण माझा हात वाचला."
बाळासाहेब आपण व्यंगचित्रकार कसा झालो? या बद्दल सांगतात की, याचे श्रेय प्रबोधनकार आणि बाबुराव पेंटर यांना देईन. बाकी इतरही आहेतच. पण, व्यंगचित्रांकडे आकर्षित झाले ते बॅनबेरींच्या व्यंगचित्रांमुळे. बाळासाहेब यांचे वडील प्रबोधनकार स्वतः चित्रकार होते.व्यंगचित्रकार म्हणून उभं राहण्यासाठी त्यांनी आधार दिला. प्रोत्साहन दिलं. व्यंगचित्रकलेतले माझे पहिले गुरू वडीलच होते. त्यानंतर मी दीनानाथ दलाल व डेव्हिड लो यांस गुरुस्थानी मानतो. बाळासाहेबांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात फ्री प्रेस जर्नलमध्ये एक व्यंगचित्रकार म्हणुन केली. 1960 मध्ये त्यांनी स्वत व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक' सुरू केलं. त्यांनी आपल्या फटकाऱ्यातून विविध घटनांवर व्यंगचित्र काढली.