विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा | पुढारी

विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे माजी मंत्री, विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासह 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर आव्हाड कोंडीत सापडले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ठाण्यात सोमवारी दिवसभर जाळपोळ, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. आम्ही अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढत असल्याने माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, त्यास मी घाबरत नाही; पण विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. म्हणूनच अशा घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे सांगत आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार हे भेटीला आले आणि आव्हाडांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून मनधरणी केली.

दरम्यान, आव्हाड यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला असून, मंगळवारी सुनावणी होणार आहे. आव्हाड यांनी कोणताही विनयभंग केला नसून, त्यांच्याविरोधात संपूर्ण षड्यंत्र रचून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस अधिकारी यांच्यासमोर घडलेला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी बोलणार असून, खरा सूत्रधार शोधा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

आव्हाड यांच्यावर याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले; तर मुंब्रा पोलिस ठाणे हद्दीत जाळपोळ, ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुंब्रा पोलिसांनी अतिरिक्त पोलिस मागवून घेतले. दरम्यान, संतप्त झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पाठविला, यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी एक वाजता ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आव्हाडांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. आपण यासंदर्भात सामूहिक लढा देऊ, असे जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना सांगितले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खालच्या पातळीचे राजकारण करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अतिशय निषेधार्ह आहे. हा गुन्हा घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर त्यावेळचे फुटेज तपासून पाहावे. आम्ही अशा राजकारणाने हरणार नाही आणि रडणारही नाही. आम्ही समर्थपणे लढा देऊन न्यायदेवतेकडे न्याय मागू, अशी भूमिका मांडली.

नेमके काय घडले?

रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे कळवा येथील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बाहेर पडत असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असताना, आव्हाडांनी आपला विनयभंग केला, अशी तक्रार भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला.

आव्हाड राजीनामा मागे घेतील : अजित पवार

ज्यांना आव्हाड हे दैवत मानतात त्यांच्या आदेशानुसार त्यांना आवडो न आवडो ते राजीनामा मागे घेतील, असे अजित पवार सांगितले. ही घटना मुख्यमंत्री यांच्यासमोर दहा फुटांवर घडली असून, समोर पोलिस अधिकारीही होते. ज्या महिलेने तक्रार केली आहे, तिला छटपूजेच्या दिवशी, ही माझी बहीण मुंबईतून मुंब्य्रात येऊन काम करते, असे एकाच व्यासपीठावर ते बोलले होते. त्या दिवशी एवढ्या गर्दीत कशाला आलीस, बाजूला हो, असे म्हणत त्यांनी तिला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसते; मग कलम 354 च्या व्याख्येत हे कसे बसते, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. सरकारने हस्तक्षेप केला नाही, तर या खोट्या गुन्ह्याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पोलिसांनी दबावाखाली काम करून कुणाची प्रतिमा मलीन करू नये. सरकार येते आणि जाते; पण लोकशाहीचे मूल्य टिकले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरेला तिलांजली देण्यात येत असून, आमच्याकडे 17 वर्षे गृह खाते होते; परंतु असे कधी घडलेले नाही, असे सांगत अजित पवार यांनी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर आसूड ओढले. याबाबतही विधानसभेत आवाज उठविण्यात येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आव्हाड यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे पवार यांनी सांगितले.

न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आव्हाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी महिला आयोगाने विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि खोटी तक्रार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ठार मारा; पण विनयभंगाचा गुन्हा नको : आव्हाड

आम्ही अन्यायाविरोधात आक्रमकपणे लढू, माझ्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, त्यास मी घाबरत नाही; पण विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. हे माझ्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आले आहे, म्हणूनच अशा घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे सांगत आव्हाड भावुक झाले.

ती भेट राष्ट्रवादी नगरसेवकाच्या घरी

जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला, अशी तक्रार करणार्‍या रिदा रशीद यांनी घटना घडल्यानंतर मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले राजन किणी यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली आणि रात्री उशिरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्याचे छायाचित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, किणी यांनी पूर्वी आव्हाड यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली आणि हारले होते.

आरोप अतिशय चुकीचा : अंजली दमानिया

विनयभंग? काय वाटेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मी खूप लढले आहे; पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे. त्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते, विनयभंग झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त करीत आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे.

तर शेकडो विनयभंग : ऋता आव्हाड

अंगावर धडकणार्‍या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल; तर बाजारात, रेल्वेमध्ये, पुलावर, गर्दीत रोज शेकड्यांनी विनयभंग होत असतील, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.

तरीही विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल होतो : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना, ही क्लिप सगळीकडे पोहोचली असून, मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमात होते. खासदार शिंदेही बाजूला उभे होते; तरीही विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल होतो, असा प्रतिसवाल केला आहे.

Back to top button