मुंबई : फार्मसीचे शैक्षणिक वर्ष कोलमडणार; दोन महिने केवळ नोंदणीच! | पुढारी

मुंबई : फार्मसीचे शैक्षणिक वर्ष कोलमडणार; दोन महिने केवळ नोंदणीच!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्वच प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अद्याप फार्मसी अभ्यासक्रमाची गेली दोन महिने नोंदणीच चालू आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्थांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून दरवर्षी मान्यतेची पूर्तता झालेली नाही. अशी कारणे सीईटी आणि डीटीईकडून सांगितली जात असली, तरी प्रवेश कधी होणार आणि शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, असा सवाल नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

पदवी आणि पदविका औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या अनेक संस्थांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीईटी सेल आणि डीटीईकडून पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची नोंदणी केली जात आहे. मात्र, पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम खोळंबून आहे. फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्थांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) कडून दरवर्षी मान्यतेची पूर्तता करावी लागते. राज्यातील बहुतांश संस्थांची मान्यता प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे वारंवार मान्यतेसाठी मुदतवाढ दिली जाते. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे.

पुन्हा मुदतवाढ

दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार बी. फार्मसी, डी. फार्मसी प्रवेशासाठी मुदत व कागदपत्रे पडताळणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. तर 2 डिसेंबरला अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. तसेच 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आक्षेप नोंदविण्यात येतील आणि 7 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तर पदविका म्हणजेच डी. फार्मसी नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणीसाठीदेखील 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Back to top button