व्यावसायिक सिलिंडरचे दर पुन्हा भडकणार | पुढारी

व्यावसायिक सिलिंडरचे दर पुन्हा भडकणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; व्यावसायिक गॅस सिलिंडरविक्री दरात दिली जाणारी सवलत बंद करण्याचे निर्देश सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्यांनी वितरकांना दिले आहेत. तेल कंपन्यांच्या या आदेशामुळे सुमारे २०० ते ३०० रुपयांची सवलत बंद झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा भडकणार आहेत.

व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणाऱ्या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना ही सवलत बंद करण्यास सांगितले आहे. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात आला असून, याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान पेट्रोलियमने १९ किलो, ३५ किलो, ४७.५ किलोसह सर्व व्यावसायिक सिलिंडरसाठी वरील निर्णय लागू केला आहे. इंडियन ऑईलने १९ किलो आणि ४७.५ किलोचे सिलिंडर कोणत्याही सवलतीशिवाय विकावेत, असे निर्देश दिले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरवर सवलत देताना घरगुती एलपीजी सिलिंडरवरील तोटा भरून काढण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या निर्णयामुळे वितरकांना सवलत म्हणून जी रक्कम दिली जात होती, ती आता कमी होणार असल्याने तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या आणि वितरकांसमोर तोटा भरून काढण्यासाठी दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येते.

Back to top button