सेन्सेक्सची 1,181 अंकांची झेप

सेन्सेक्सची 1,181 अंकांची झेप
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : अमेरिकेतील चलनवाढीची ऑक्टोबरमधील आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारही वधारले. मुंबई शेअर निर्देशांक 61 हजार 311.02 अंक पातळीवर खुला झाला. त्याने या सत्रात 61 हजार 840.97 अंकांची उच्चांकी, तर 61 हजार 311.02 अंकांची नीचांकी नोंदवली. गुरुवारच्या सत्राच्या तुलनेत त्यात 1,181.34 अंकांची जोरदार वाढ झाली. तो अखेरीस 61 हजार 795.04 अंक पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टी 18 हजार 272.35 अंक पातळीवर खुला झाला. त्याने 18 हजार 362.30 अंकांची उच्चांकी व 18 हजार 259.35 अंकांची नीचांकी नोंदवली.

अखेरीस कालच्या तुलनेत त्यात 321.50 अंकांची जोरदार वाढ होऊन तो 18 हजार 349.70 अंक पातळीवर बंद झाला. अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्याच्या वृत्ताचे जगभरात पडसाद उमटले. सर्वत्र उत्साह निर्माण होऊन गुंतवणूकदारांच्या आशाही वाढल्या. त्यामुळे निफ्टी ऑटो, एफएमसीजी आणि पीएसयू बँक या निर्देशांकांतील किरकोळ घसरण वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक उसळले. निफ्टी आयटी निर्देशांक हा जवळपास 4 टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर आहे.

माहिती-तंत्रज्ञान आणि वित्तसेवा या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये शुक्रवारी विशेष तेजीमय वातावरण होते. या सत्रात सेन्सेक्सने 61,840.97 अंकांची, तर निफ्टीने 18,362.30 अंकांची गेल्या वर्षभरातील उच्चांकी पातळी नोंदवली. शेअर्सचे बाजारमूल्य या सत्रात 2.98 लाख कोटींनी वर गेले. या सत्रात प्रामुख्याने एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र आणि टीसीएस यांच्यात जोरदार भाववाढ झाली. एचडीएफसी ट्विन्स, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, एल अँड टी, बजाज या इतर दिग्गजांमुळे बाजाराला चालना मिळाली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप या निर्देशांकांनी अनुक्रमे 0.15 टक्के आणि 0.33 टक्क्याची भर घातली.

या सत्रात 'अ' गटात एकूण 708 कंपन्यांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 416 कंपन्यांची भावपातळी वर गेली, तर 284 कंपन्यांची भावपातळी खाली आली. 8 कंपन्यांचे भाव स्थिर राहिले. कोटक बँक, इन्फोसिस व एचडीएफसी या कंपन्यांमध्ये मोठी भाववाढ झाली, तसेच स्टेट बँक, महिंद्र व एनटीपीसी या कंपन्यांमध्ये घसरण झाली. या सत्रातील सर्वाधिक उलाढाल एचडीएफसी बँक या कंपनीमध्ये झाली. त्याखालोखाल इन्फोसिस, एचडीएफसी व रिलायन्समध्ये उलाढाल झाली.

एक टक्का बाकी

यापूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 62,245.43 आणि 18,604.45 या सार्वत्रिक उच्चांकावर पोहोचलेले होते. ती पातळी पुन्हा गाठण्यास आता या निर्देशांकांना केवळ 1 टक्क्यांची वाढ इतकीच मजल मारायची आहे.

आता सीपीआयवर लक्ष

सर्वांचे लक्ष आता भारताच्या ग्राहक किंमत चलनवाढीवर (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स – सीपीआय) आहे. येत्या 14 नोव्हेंबरला त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल. ब्लूमबर्ग या कंपनीच्या मते, ऑक्टोबरमधील सीपीआय 6.7 टक्क्यांवर असण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील हा आकडा 7.69 टक्के होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news