T20 World Cup : विश्वचषकातील पराभवाचे खलनायक | पुढारी

T20 World Cup : विश्वचषकातील पराभवाचे खलनायक

भारताच्या विश्वचषकातील (T20 World Cup) दारुण पराभवानंतर काही खेळाडू मायदेशी परततील तर उरलेले न्यूझीलंडला जातील. सेमीफायनल सामन्यानंतर मात्र रोहित शर्माने पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडले. आपल्याला पराभवाची खरी उत्तरे शोधायची असतील तर डोळसपणे लेखाजोखा मांडायला हवा. ही आकडेवारी खेळाडूच्या कामगिरीसंदर्भात पूरक माहिती देते, पण या आकडेवारीशिवाय जिंकण्यासाठी लागते ती विजिगिषु वृत्ती. कुठचीही आकडेवारी आपल्या बाजूने नसताना कपिलदेवने ते 1983 साली करून दाखवले, धोनीने नवा संघ घेऊन 2007 ला करून दाखवले तर 2011 ला स्वतः नायक बनून करून दाखवले.

क्रिकेट हा क्रूर खेळ आहे तेव्हा पराभवात आणि त्यात अशा लाजिरवाण्या पराभवात खलनायक कोण ठरले हे बघावेच लागेल. यात खेळाडूंच्या आधी पहिला क्रमांक लागतो तो निवड समितीचा आणि बीसीसीआयच्या धोरणांचा. या विश्वचषकासाठी भारतीय संघाचे सरासरी वय होते 30.2 वर्षे. टी-20 क्रिकेट हे तरुण रक्ताचे क्रिकेट आहे. यात पूर्ण वीस षटके सामन्याचा निकाल ठरवत नाही तर 3 उत्तम षटके सामन्याचा निकाल ठरवतात. ही उत्तम षटके खेळायला ताज्या दमाचे फलंदाज आणि गोलंदाज लागतात. जो 2007 चा विश्वचषक धोनीने जिंकला त्या संघाचे सरासरी वय होते 23.6 वर्षे. अगदी गेल्या वर्षीच्या दुबईतल्या विश्वचषकातही संघाचे सरासरी वय होते 28.9 वर्षे. ऑस्ट्रेलियात खेळताना अनुभव कामाला येतो हे जुने कारण सातत्याने पुढे केले तर कसोटीतही अजिंक्य रहाणेने ताज्या दमाच्या खेळाडूंना घेऊन मालिका जिंकायची कामगिरी करून दाखवली आहे.

राहुल द्रविडने थेट बीसीसीआयकडे बोट दाखवले ते म्हणजे आपल्या खेळाडूंना बोर्ड बाहेरच्या देशातील लीग खेळायला परवानगी देत नाही. या म्हणण्यात तथ्य आहे. अलेक्स हेल्स आज आयपीएल, कॅरेबियन लीग, पाकिस्तानी लीग आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग खेळतो. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला दिसला, हॅरिस रौफला बिग बॅशमुळे मेलबर्न हे घरचे मैदान आहे म्हणूनच आज पाकिस्तानच्या संघातील तो सर्वाधिक धोकादायक गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे विश्वचषकाच्या संघनिवडीसाठी आपली जी प्रयोगशाळा लांबली त्याने जो संघ उतरवणार होतो त्याला एकत्रपणे सराव करायला संधीच मिळाली नाही आणि राहुल द्रविडला पर्थला दोन जादा सराव सामन्यांची मागणी करावी लागली. इतके प्रयोग करून जो संघ निवडला त्यातल्या विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप यांनी अपेक्षित कामगिरी केली, पण बाकीचे सपशेल फेल गेले.

रोहित शर्मा – एक फलंदाज म्हणून 6 सामन्यांत त्याने 19.33 च्या सरासरीने आणि फक्त 106.42 च्या स्ट्राईक रेटने 116 धावा काढल्या. त्यात नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध त्याचे स्पर्धेतले एकमेव अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियन मैदाने त्याला नवीन नाहीत, पण त्याला वारंवार पूलच्या जाळ्यात अलगद पकडले गेले. फलंदाज म्हणून तो अपयशी ठरलाच, पण एक कर्णधार म्हणून जास्त अपयशी ठरला. पहिल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून शेवटपर्यंत त्याचे डावपेच कुठे दिसलेच नाहीत. (T20 World Cup)

गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षण रचना आणि प्रत्येक प्रतिस्पर्धी फलंदाजाचा अभ्यास करून त्याला बाद करण्याचा कुठलाही प्लॅन कधीही दिसला नाही. प्रतिस्पर्धी वरचढ होतो आहे हे लक्षात आले की त्याची देहबोली नकारात्मक दिसायची. सामना शेवटच्या क्षणापर्यंत खेचून न्यायाचे कुठलेच प्रयत्न तो करत नव्हता. भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्धच्या विजयात त्याचे कर्णधार म्हणून वाटा असण्यापेक्षा नशिबाचा वाटा जास्त होता.

के एल. राहुल – सातत्याने मोठ्या सामन्यात अपयशी ठरायची त्याची खासियत इथेही त्याने कायम ठेवली. विश्वचषकाच्या आधी आशिया चषकाच्या श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात 6 धावा, 2019 च्या उपांत्य फेरीत 1 धाव तर आता इंग्लंडविरुद्ध 5 धावा त्याने काढल्या आहेत. मुळात राहुल हा रिझवान, बटलर, कॉनवे इत्यादींसारख्या सलामीला येऊन एक हाती सामना फिरवून देऊ शकणारा खेळाडूच नाही. 6 सामन्यांत 21.33 च्या सरासरीने आणि 120.75 च्या स्ट्राईक रेटने त्याने 128 धावा काढल्या आहेत यात गोलंदाजीत दुबळ्या बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतके असली तरी पाकिस्तान, द. आफ्रिका आणि इंग्लडच्या गोलंदाजांनी त्याला दोन आकडी धावसंख्याही गाठू दिली नाही.

राहुल आणि रोहित शर्मा जोडीने 6 पैकी एकही सामन्यात भारताला उत्तम सुरुवात करून दिली नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्ये डावाचा पाया रचल्यावर कोहली, सूर्या आणि पंड्या कळस रचतील अशी रचना होती, पण दरवेळी पायासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः राहुल आणि शर्मा पडायचे आणि कोहली सूर्याला इमारतीचे पिलर होण्यापेक्षा पायाचे दगड व्हायला लागायचे याचा परिणाम धावसंख्येचा कळस छोटा दिसायचा.

दिनेश कार्तिक – याची संघातील भूमिका फिनिशरची होती. वास्तविक हे असले टॅग आपणच लावतो. इंग्लंडच्या या उपांत्य फेरीच्या संघात आदिल रशीद 11 व्या स्थानावर फलंदाजी करणार होता आणि त्याची फलंदाजीची क्षमता बघता तो ही फिनिशर असू शकतो. दिनेश कार्तिक 37 व्या वर्षीही कसा फिट आहे याचे कौतुक संघाच्या कामगिरीला उपयुक्त नव्हते. जेव्हा खरंच सामना फिनिश करायचा होता तेव्हा दोनदा त्याने पॅनिक बटण दाबले.

मुळात दिनेश कार्तिक साठी ऋषभ पंतला टी-20च्या संघात स्थान न मिळणे हेच पटण्यासारखे नव्हते. जेव्हा दिनेश कार्तिकला खेळवणे अंगाशी यायला लागले तेव्हा पंतला संघात घेतले, पण यातून संदेश काय जातो तर पंत हा संघाच्या मूळ स्कीममध्ये बसत नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पंतने स्वतःला धडाकेबाज फलंदाजीने सिद्ध केले आहे तेव्हा या प्रकाराने त्याचे एक प्रकारे आपण खच्चीकरण केले. बरं त्याला घेतले तर सलामीला खेळवणे जास्त संयुक्तिक ठरले असते. राहुल जेव्हा सातत्याने लवकर बाद होत होता. तेव्हा पंतला सलामीला संधी देऊन आपला काहीच तोटा झाला नसता. टी-20 फॉरमॅट आणि एकूण स्पर्धेचे वेळापत्रक बघता दोन यष्टिरक्षकांची गरजच नव्हती.

भुवनेश्वर कुमार – विश्वचषकाच्या 6 सामन्यांत याला 4 बळी मिळाले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला ढगांचे आच्छादन होते तेव्हा त्याने योग्य लेंग्थ राखत स्विंग मिळवला, पण दरवेळी हे वातावरण मिळायला हे काही इंग्लंड नव्हते. इथल्या खेळपट्ट्यांवर काय लेंग्थने गोलंदाजी करायला पाहिजे, छोट्या सीमारेषा असलेल्या मैदानात गोलंदाजीच्या वेगात आणि टप्प्यात काय बदल केला पाहिजे हे ओळखून त्याने गोलंदाजी केली नाही. निव्वळ स्विंगवर अवलंबून असल्याने त्याचे पर्यायही मर्यादित आहेत. आशिया चषकात पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात 19 वे षटक खराब टाकल्याने त्याच्यावर डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी न केल्याबद्दल टीका झाली होती. भुवनेश्वर कुमार हा ऑस्ट्रेलियात चालणारा गोलंदाजच नाही. वेग आणि हार्ड लेंग्थवर गोलंदाजी करू शकणारे गोलंदाज ऑस्ट्रेलियात यशस्वी होतात. दडपणाखाली आल्यावर भुवनेश्वर कुमार गडबडून जातो हे या सामन्यात पुन्हा सिद्ध झाले हर्षल पटेलला संघात असून आपण संधी दिली नाही.

मोहम्मद शमी – गेल्या वर्षीच्या विश्वचषकतील खराब कामगिरी नंतर निवड समितीच्या थिंक टँकला शमी टी-20 प्रकारात योग्य वाटेनासा झाला. यंदाच्या आशिया चषकातील आपल्या खराब कामगिरीनंतर शमीला घरच्या द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया मालिकांसाठी पुन्हा संघात घेतले. शमीची निवड खरं तर मूळच्या संघात व्हायला हवी होती, पण त्याला कोरोना झाल्याचे निमित्त झाले. त्याचा कोरोना जरा जास्तच लांबला आणि बुमराह जेव्हा विश्वचषक खेळणार नाही हे नक्की झाले तेव्हा निवड समितीला शमीची आठवण झाली. या अशा प्रकारांनी त्या खेळाडूला तुम्ही पहिली पसंती नव्हती, पण नाईलाज म्हणून तुमची निवड करत आहोत असाच संदेश जातो.

कुठच्याही खेळाडूच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मानासाठी हे उपयुक्त नसते. कर्णधार आणि निवड समितीचा विश्वास नाही म्हणून इतके प्रस्थापित असलेले खेळाडू स्वतःला नव्याने सिद्ध करायला जातात आणि त्यात अनेक गोष्टी करून दाखवायच्या नादात लय घालवून बसतात. अशावेळी गरज असते ती कर्णधाराच्या भरवशाची ज्यायोगे ते नैसर्गिक खेळ करतात जो जास्त चांगला असतो. शमी या विश्वचषकात पूर्ण निष्प्रभ ठरला. त्याच्या आजारपणातून तो पुरता तंदुरुस्त झाला होता का तसेच त्याला आपण खेळवले अशी शंका यायला वाव आहे.

रविचंद्रन अश्विन – टी- 20च्या संघात आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 36 वर्षांचा अश्विन संघात हवा का नको हा चर्चेचा विषय होता. डावखुरे फलंदाज संघात असणार्‍या संघांविरुद्धही त्याला यश मिळाले नाही. नेदरलँड आणि झिम्बाब्वे विरुद्ध बळी सोडले तर त्याची कामगिरी सुमारच होती. ना त्याच्या गोलंदाजीत वैविध्य होते ना कल्पकता. बळी मिळवण्यापेक्षा धावा रोखणे हा उद्देश अश्विनसारख्या अनुभवी खेळाडूचा असू शकत नाही. अ‍ॅडलेडला दिवसाच्या सामन्यात फिरकीला साथ मिळते, पण रात्रीच्या वेळी साथ नसते. ऑस्ट्रेलियात चेंडू बॅटवर येण्यापेक्षा बॅटपासून दूर जात असेल तर बळींची शक्यता वाढते. या हिशेबाने आक्रमक लेग स्पिनर यजुवेंद्र चहलला संधी देऊन बघायला हरकत नव्हती. अश्विनने काही मोजक्या संघी मिळाल्या तेव्हा फटकेबाजी केली, पण त्याचा संघातील मूळ हेतू काही साध्य झाला नाही. त्याचे वय त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या आड येते.

अक्षर पटेल – याचे संघातील स्थान गोलंदाजी करू शकणारा फलंदाज का फलंदाजी करू शकणारा गोलंदाज हे शेवटपर्यंत स्पष्ट झाले नाही. पहिली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3 बाद 30 असताना आपण अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवले, पण त्याला ती भूमिका पार पाडता आली नाही. झिम्बाब्वेसारख्या संघाने त्याच्याविरुद्ध धावा लुटल्या. थोडक्यात सांगायचे तर आशियातल्या खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरलेला अक्षर ना धड फलंदाज ना धड गोलंदाज म्हणून यशस्वी ठरला.

राहुल द्रविड- खेळाडूंचा लेखाजोखा मांडताना राहुल द्रविडच्या भूमिकेबद्दलही बोलावेच लागेल. द्रविड हा मुळातच आक्रमक माणूस नाही, पण संघ प्रशिक्षकाचा स्वभाव आक्रमक नसला तरी त्याला आक्रमक चाली रचण्यावर बंधन नसावे. या चाली मैदानावरील त्याच्या शिलेदारांकडून करून घ्यायच्या असतात. राहुल द्रविडने 19 वर्षांखालील खेळाडूंचा संघ उत्तम बांधला, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उत्तम काम केले, पण भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून डावपेच रचण्यात तो कमी पडतोय. या सामन्यातही जेव्हा इंग्लंड धुलाई करत असताना ड्रिंक्समध्ये तो मैदानात आला, तेव्हा एक शब्दही खेळाडूंशी बोलताना दिसला नाही. द्रविड अभ्यासू आहे, हुशार आहे, पण वैयक्तिक गुण आणि प्रशिक्षक म्हणून खेळाडूंकडून खेळ करून घ्यायचे कौशल्य किंवा त्यांना मार्गदर्शन करणे यात फरक आहे. विश्वचषक तर टीव्हीवर कितीही जाहिरात केली तरी अजून प्रतीक्षेतच राहिला. विजयाची बस आता लंडनला निघते का इस्लामाबादला हेच पाहणे आपल्या नशिबी आले आहे.

Back to top button