मोबाईलवर अश्लील अ‍ॅप डाऊनलोड करणे पडले महागात | पुढारी

मोबाईलवर अश्लील अ‍ॅप डाऊनलोड करणे पडले महागात

धारावी; पुढारी वृत्तसेवा : मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करणे धारावीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या बँक अकाउंटमधून 42 हजार 722 रुपयांची रोकड काढून पीडित तरुण व त्याच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून त्याला पाठविल्याने त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी वरळी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या दोन दिवसाआधी धारावीतील राजीव गांधी नगरमध्ये राहणारा तरुण आपला मोबाईल कंपनीमध्ये विसरला असता त्याच्या मित्राने एक अश्लील अ‍ॅप डाऊनलोड केला. अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने तो अ‍ॅप काढून टाकला. दुसर्‍या दिवशी कंपनीत पोचलेल्या तरुणाने मित्राकडून आपला मोबाईल घेतला. अवघ्या काही तासातच त्याला तुमचे 12 लाखाचे लोन असल्याचा निनावी फोन आला.

आधी त्याने दुर्लक्ष केले. वारंवार फोन येऊ लागल्याने तात्काळ धारावी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर अज्ञात इसमाने वारंवार येणारे फोन बंद करण्यासाठी 4 हजार रुपये मागितले. तरुणाने युपीआय आयडीद्वारे 4 हजार पाठविले. तेव्हापासून कॉल येणे बंद झाले. दोन महिन्यानंतर तरुणाने बंद केलेला नंबर पुन्हा चालू केला तर त्याच्या बँकेतील खात्यातून यूपीआय आयडीद्वारे एकूण 12 हजार 722 रुपये काढण्यात आल्याचे पाहून त्याला धक्काच बसला.

6 नोव्हेंबरला सायबर चोराने 26 हजार रुपये पाठव अन्यथा अश्लील फोटो पाठवीन असे धमकावत मॉर्फ केलेले फोटो पाठवत 26 हजार रुपये अकाऊंटमधून काढून घेतले. तरुणाने मोबाईल स्वीचऑफ केला. मात्र पीडित तरुणाचा संपूर्ण मोबाईल डाटा हॅक केलेल्या सायबर चोरट्याने त्याच्या पत्नीला फोनवरून संपर्क साधून आपण ओळखता काय? असे विचारले. तिने होकार देताच पतीचे 25 लाखांचे लोन असल्याचे सांगत तिला दोघांचे नग्न फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

Back to top button