मुंबई : महिला अधिकाऱ्याला गाणे म्हणायला लावणारा अधिकारी पदावरून कार्यमुक्त | पुढारी

मुंबई : महिला अधिकाऱ्याला गाणे म्हणायला लावणारा अधिकारी पदावरून कार्यमुक्त

मुंबई: पुढारी वृत्तसेवा; ‘माझे डोके दुखत आहे. मला बरे वाटत नाही’, असे बोलून महिला अधिकाऱ्याला गाणे म्हणायला लावणाऱ्या अधिकाऱ्याला सध्या असलेल्या विभागातील पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. हा अधिकारी मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव पदावर कार्यरत होता. या घटनेची दखल घेत प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्याचे शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

मंत्रालयातील वरीष्ठ महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. सदर महिलेने या संतापजनक घटनेची शासनाकडे तक्रार केली होती. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याकडेही त्या महिलेने दाद मागितली होती. त्यावर गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी गाणे म्हणावयास लावणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासनाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी संबंधित अधिकारी आनंद माळी यांना बहुजन कल्याण विभागातून कार्यमुक्त करून सामान्य प्रशासन विभागात धाडले आहे. डॉ. गोऱ्हे व वाघ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Back to top button