अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक; दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान | पुढारी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक; दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानास सुरूवात झाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली, तरी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह इतर सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज गुरुवारी (दि. 3) मतदान होत आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. यामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के तर ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान  झाल्याची माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच ‘धनुष्यबाण’ चिन्हाऐवजी ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. अंधेरी (पूर्व) मतदारसंघात 38 मतदान केंद्रांवर मतदान होईल. मतदानासाठी एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत.

Back to top button