

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी विविध पदांच्या भरतीवर असलेले निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केला. यातून अनुकंपा तत्वावरील पदे मात्र वगळण्यात आली आहेत.
मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालये यामधील गट-क मधील लिपिक. टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत भरण्यात येतात. दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवा पदभरती जिल्हा/प्रादेशिक / राज्यस्तरीय निवडसमित्यांच्या माध्यमातून करण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेने भरावयाची गट-कमधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता ही पदे भरण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. या निर्णयामुळे लिपिक भरतीची प्रतीक्षा करणार्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1) पहिल्या टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी कार्यपध्दती विहित करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे संबंधित विभागाने आपली मागणीपत्रे पाठविणे आवश्यक असेल.
2) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपिक-टंकलेखक पदांकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करताना उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम घेण्यात येणार आहे. आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे उमेदवारांची शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिध्द करण्यात येईल.
3) दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील लिपिकवर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणली असली तरी, सदर पदांना जे आरक्षण यापूर्वी लागू होते त्यानुसारच सदर पदांना आरक्षण व अनुषंगिक सोयी-सवलती यापुढेही लागू राहतील. पदभरतीकरिता आयोगाकडे मागणीपत्र पाठविताना अनुकंपा भरतीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार रिक्त पदांची गणना करावी. अनुकंपा तत्वावरील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर राहील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
गट क संवर्गा तील सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा शासनाचा निर्णय स्पर्धा परीक्षांच्या व आयोगाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल. या निर्णयामुळे हुशार, गरजू व होतकरू उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने शासन सेवेत काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
-सुनील अवताडे, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग