Stock Market | फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार | पुढारी

Stock Market | फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार

Stock Market : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चौथ्यांदा केलेली व्याजदर वाढ आणि कमकुवत जागतिक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली होती. पण त्यानंतर शेअर बाजार सावरला. सकाळी साडेदहाच्या सुमारात या घसरणीला ब्रेक लागला. यामुळे सेन्सेक्स ६०,८०० वरुन ६१ हजारांच्या दिशेने झुकला आहे. तर निफ्टी १८ हजारांवर व्यवहार करत आहे.

प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली आला होता. त्यानंतर सत्र सुरु होताच सेन्सेक्स ६०,८०० वर होता. दरम्यान, बुधवारच्या ८२.७८ च्या तुलनेत गुरुवारी रुपया प्रति डॉलर ८२.८८ वर खुला झाला.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर रात्रभर घसरण झाली. याचा मागोवा घेत आशियाई समभागही घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.०५ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी आणि हँग सेंग निर्देशांक २.३७ टक्क्यांनी घसरला.

अमेरिकेची प्रमुख बँक फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी वाढती महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात आणखी ७५ बेसिक पॉइंट्सची वाढ केली. फेडरल रिझर्व्हने याआधी २१ सप्टेंबर रोजी व्याजदरात ७५ बेसिक पॉइंटची वाढ केली. आता चौथ्यांदा व्याजदरवाढ केली आहे. अमेरिका गेल्या काही वर्षापासून वाढत्या महागाईचा सामना करत आहे. सप्टेंबरसाठी महागाई दर ८.२ टक्क्यांवर होता. जो फेड रिझर्व्हने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या चारपट जास्त आहे. सप्टेंबरमध्ये फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले होते की महागाई दर २ टक्क्यांवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

 हे ही वाचा :

Back to top button