मुंबई आवडत नाही तर मुंबई सोडून जा! जुही चावलाला रामदास आठवलेंची खोचक टिपण्णी

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : सिने अभिनेत्री जुही चावला हिने मुंबईच्या हवेत दुर्गंधी असल्याचे ट्विट केले आहे. तिच्या ट्विटचा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी चांगलाच समाचार घेतला. मुंबईला एक आगळे वेगळे महत्व असून मुंबई आवडत नसेल तर खुशाल मुंबई सोडुन जावे असा सल्ला दिला. जुही चावला हिने मुंबई बाबत केलेले स्टेटमेंट मागे घेऊन बाबत माफी मागावी, असे ही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात जेष्ठ दलित साहित्यिक तथा विचारवंत लेखक पँथर डॉ.प्राध्यापक विठ्ठल शिंदे यांच्या दलित पँथर क्रांतिकारी नोंदी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. आठवले यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात दलित पँथर चळवळीच्या 50 वर्ष कालावधी लोटल्याने या संघटनेच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी जूही चावलाच्या ट्विटबद्दल विचारले असता, मुंबई आवडत नाही तर मुंबई सोडून जा, अशी आठवलेंनी खोचक टिप्पणी केली.