राजकीय द्वेषापोटी मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली : महेश तपासे | पुढारी

राजकीय द्वेषापोटी मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली : महेश तपासे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात तीन महिन्याआधी घटनाबाह्य मार्गाने सत्ता परिवर्तन झाले. याबाबतचा खटला अजून न्यायप्रविष्ट असतानाच मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपास यांनी म्‍हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सातत्याने विरोध करत असल्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा काढली. यामागे एक राजकीय षड्यंत्र आहे, अशी टीकाही त्‍यांनी  केली आहे.

राज्यात गुंतवणूक, प्रकल्प, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न या अशा अनेक विषयांवर अपयशी ठरलेले शिंदे सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सुरक्षा काढली म्हणून भीतीपोटी आम्ही घरी बसू व सरकारचा विरोध करणे थांबवू, असा कदाचित गोड गैरसमज मुख्यमंत्र्यांचा असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुरक्षा काढली तरी अधिक ताकदीने राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करतील. त्याची प्रचिती या सरकारला लवकरच येईल, असा इशाराही तपासे यांनी दिला आहे. दरम्यान, शिर्डी येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविली जाईल, असेही तपासे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button