फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद | पुढारी

फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. आपलीच शिवसेना खरी असा दावा सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म जमा केले जात आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटनुसार अर्ज नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल अडीच लाख अर्ज बिनकामी ठरले आहेत.

ठाकरे गटाने अलीकडेच दोन ट्रक भरून सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. शिवसेनेवरील आपला दावा बळकट करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे प्राथमिक सदस्यत्वांचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत साडेआठ लाख अर्जांचे गठ्ठे आयोगाकडे पाठविले आहेत. त्यासाठी दोन ट्रकभरून गठ्ठे आयोगाच्या दिल्ली कार्यालयाकडे रवाना करण्यात आले आहेत. ठाकरे गटाने राज्यभरातून सुमारे अकरा लाख अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पक्षाने विहित नमुन्यात अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे पाठविली आहेत. यात पक्षाची प्रतिनिधी सभा, पदाधिकार्‍यांसोबतच बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत. यांची संख्या जवळपास अडीच लाख असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते खा. अनिल देसाई यांनी दिली आहे. आणखी काही जिल्ह्यातून अर्ज, प्रतिज्ञापत्रे आणण्याचे काम सुरू
आहे. तेही आयोगाकडे पाठविले जातील, असेही देसाई यांनी सांगितले.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी काही काळासाठी गोठविली आहे. मात्र, पक्ष आणि चिन्हासाठीची लढाई अद्याप आयोगासमोर सुरू आहे. या लढ्याच्या अंतिम निकालानंतरच शिवसेना कुणाची याचा फैसला होणार आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे काम सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील आपल्या सर्व जिल्हाप्रमुखांना आणि नेत्यांना अधिकाधिक सदस्यत्व नोंदणी आणि प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध जिल्ह्यांतील नेत्यांनी सदस्यत्व नोंदणीचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे मातोश्री आणि शिवसेना भवनात जमा केले.

Back to top button