

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी सणाचा पहिला दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नेहमीप्रमाणे दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मनसेच्या वतीनं आज (दि. 21) मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष, महिला-पुरुष पदाधिकारी यांनी या दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनसेच्या पोस्टरमुळे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसे, भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होण्याच्या चर्चेला उधान आले आहे. मनसेने आपल्या पोस्टवर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची छायाचित्रे झळकवली आहेत. त्यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण उदयाला येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, "राजकारणात कोणीही कोणासाठीही दरवाजे बंद करत नाही. मात्र मनसेसोबत युती करण्याबाबत आम्ही कोणताही औपचारिक निर्णय घेतलेला नाही. येथे 'दीपोत्सव' कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मनसेने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावले आहे,' असा दुजोरा भाजप नेत्याने दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर ते बराच काळ राजकीय घडामोडींपासून दूर होते. मात्र, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावर गेले होते. तसेच त्यानंतर राज ठाकरे मुख्यमंतत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा बंगल्यावर जाऊन आले. सातत्याने या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. नुकतेच राज ठाकरे हे मंत्रालयात मुक्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळीळे अंधेरी पोटनिवडणुकीचे वारे होते. शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने एकत्रीत उमेदवार दिला होता. दरम्यान, या निवडणुकीत मनसे भजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या उमेदवाराला पाठिंबा दीएल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने उमेदवार अंधेरी पोटनिवडणूक न लढवता माघार घ्यावी. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा त्यांनी आपल्या पत्रात दाखला दिला होता. यानंतर भाजपनेही तत्काळ राज यांच्या त्या पत्राची दखल घेत पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती.