मुंबई : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन डिसेंबरपासून पुन्हा सेवेत | पुढारी

मुंबई : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन डिसेंबरपासून पुन्हा सेवेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ- माथेरान मिनी (नॅरो गेज) ट्रेन येत्या डिसेंबर
महिन्यापासून पुन्हा रुळांवर धावणार आहे. या मार्गातील रुळांसह अन्य कामे पूर्ण झाली असून ट्रेनची चाचणी सुरू आहे. तब्बल तीन वर्षानंतर नेरळ ते माथेरान दरम्यान थेट मिनी ट्रेन धावणार आहे.

सध्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा चालवण्यात येत आहेत. 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ
ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातून जाणार्‍या मिनी ट्रेनच्या रुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे रुळांखालील खडीसह रुळही वाहून गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरळ ते माथेरान मिनी  ट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती.

प्रवासी, पर्यटक आणि स्थानिकांच्या सोयीसाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा चालवण्यात येतात. नेरळ ते माथेरान मार्गावर आता नवीन रूळ, खडी तसेच अन्य कामे केली आहेत. नेरळ ते अमन लॉज दरम्यान 20 कि.मी. च्या नवीन रुळांचे काम केले आहे. अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजनाही केल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होताच चाचणी देखील सुरू करण्यात आली

दुरुस्तीची कामे पूर्ण; रेल्वेकडून चाचणी

सध्या माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू आहे. या फेर्‍यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. माथेरान ते अमन लॉज शटल फेर्‍यांमधून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत मध्य रेल्वेने एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तर पाच महिन्यांत 1 लाख 54 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

नेरळ ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेन चालवण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. डिसेंबरपर्यंत या मार्गावर मिनी ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Back to top button