मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी कर्मचार्यांना भाऊबीज भेटीपोटी राज्य सरकारतर्फे 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
बालकांमधील कुपोषणाशी लढण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली असून सध्या राज्यात 10 लाख 8 हजार 5 अंगणवाड्या, मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. तसेच राज्यात सध्या 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत. राज्यात 1 लाख 89 हजार 277 अंगणवाडी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये अदा करण्यात येतात.
त्यानुसार 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांना मागील वर्षाप्रमाणे 2 हजार रुपये भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता 37 कोटी 85 लाख 54 हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर भाऊबीज कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.