ग्रा.पं. निवडणुकीत भाजपची मुसंडी | पुढारी

ग्रा.पं. निवडणुकीत भाजपची मुसंडी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 18 जिल्ह्यांमधील एक हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मात्र, या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढविल्या जात नसतानाही आम्हालाच सर्वाधिक ठिकाणी सरपंचपदे मिळाली असल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.

भाजपने 397, बाळासाहेबांची शिवसेना 81, काँग्रेस 104, राष्ट्रवादी 98 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 87 ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.

भाजप

राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपद तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात एक हजार 79 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. निवडणुकांमध्ये सुमारे 74 टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम पीच समजल्या जाणार्‍या ठाणे जिल्ह्यातील 134 तर पालघरमधील 336 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. रायगड 16, रत्नागिरी 36, सिंधुदुर्ग 4, नाशिक 187, नंदुरबार 200, पुणे 1, सातारा 4, कोल्हापूर 3, अमरावती 1, वाशीम 1, नागपूर 15, वर्धा 9, चंद्रपूर 92, भंडारा 19, अशा एकूण 1079 ग्रा.पं.साठी मतदान झाले होते.

भाजपाचे शक्तीस्थळ समजल्या जाणार्‍या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजयी झाल्याचा दावा केला आहे. आमचे कोण कोण लोक निवडून आले आहेत याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. आम्ही हवेत दावे करीत नाही. आधीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी विजयाचे दावे केले. मात्र नंतर वस्तुस्थिती स्पष्ट झाली, असे फडणवीस यांनी सांगितले

भाजपच नंबर वन : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत 1 हजार 141 पैकी आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत सर्वाधिक 397 जागा जिंकून भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांनी राज्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत भक्कम विश्वास आहे, हे आज पुन्हा या निकालांनी अधोरेखित झाले. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मिळून एकूण 478 जागांवर विजय संपादन केला, असे ते म्हणाले.

 

भाजप – 397
शिंदे गट –  81
काँग्रेस –  104
राष्ट्रवादी – 98
शिवसेना ठाकरे गट – 87

 

Back to top button