एसटीतील 5 हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द! | पुढारी

एसटीतील 5 हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  एसटी महामंडळाच्या कोकण, पुणे आणि नाशिक या विभागांत चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांऐवजी पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार होती. निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. मात्र, कंत्राटी चालक भरण्याचा निर्णयच रद्द करण्यात आला आहे.

2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या चालक कम वाहकांची भरती करण्याचा निर्णय झाल्याने हा नवा निर्णय घेण्यात आला. कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत तब्बल सहा महिने संप केला. या संपकाळात सर्वच कर्मचारी संपावर असल्याने एसटीची राज्यातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. संपकाळात महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती केली. परंतु संप मिटल्यानंतर या कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाकाळात 2016-17 व 2019 मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या चालक कम वाहक संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती उठल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नियुक्ती न झाल्याने उमेदवार वारंवार एसटी महामंडळाकडे विचारणा करत होते. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

Back to top button