ऋतुजा लटके यांच्या विरोधात तक्रार करणारा रमलू चिन्नय्या नेमका कोण? | पुढारी

ऋतुजा लटके यांच्या विरोधात तक्रार करणारा रमलू चिन्नय्या नेमका कोण?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी राजीनामा नाट्याची खेळी खेळण्यात आली. या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू असताना पालिकेने चक्क लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचे सांगितले. यासाठी रमलू चिन्नय्या नावाचा तक्रारदारही उभा केला. पण हा तक्रारदार नेमका कोण, हे आजही गुलदस्त्यात आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत दिवंगत आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी शिंदे गट व भाजपाने अनेक प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. थेट पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर दबाव आणून राजीनामा रोखून धरण्यात आला होता. आयुक्तांनीही राजीनामा मंजूर करू पण, यासाठी किमान महिन्याभराचा वेळ लागेल, असे ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने थेट हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पहिल्या सत्रात राजीनामा मंजूर का केला जात नाही, असा सवाल पालिका प्रशासनाला केला. त्यानंतर दुसर्‍या सत्रात पालिकेने हायकोर्टात उत्तर सादर करताना ऋतुजा लटके यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्याचे सांगत राजीनामा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिल्यामुळे आयुक्तांच्या पर्यायाने पालिका प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणार्‍या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चांगला धक्का बसला.

ष्टाचाराची तक्रार करणारा नेमका तक्रारदार कोण याचा शोध घेतला असता, अंधेरी पूर्वेकडील एका झोपडपट्टीचा पत्ता आढळून आला. तर तक्रारदाराचे नाव रमलू चिन्नय्या होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पालिकेच्या चौकशी टीमने झोपडपट्टीमधील रमलुला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अशा प्रकारची व्यक्ती झोपडपट्टीमध्ये राहत नसल्याचे येथील रहिवाशांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा रमलू नेमका कोण ? त्याला तक्रार करण्यासाठी कोणी सांगितले, की हा रमलू काल्पनिकच होता, हे आजही गुलदस्त्यात आहे. मात्र, या रमलुचे पात्र लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी कोर्टात उभे केल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोप करणार्‍या रमलुचा महापालिका शोध घेणार की, फाईल दाबून टाकणार हे आता येणारा काळच ठरवेल.

Back to top button