अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : शिंदे गटाला भाजपचा सबुरीचा सल्ला | पुढारी

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : शिंदे गटाला भाजपचा सबुरीचा सल्ला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार उतरवण्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र ऋतुजा लटके या ठाकरे गटातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे शिंदे गटाला भाजपने सबुरीचा सल्ला दिला व स्वतःच या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळणार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र लटके या निवडणूक रिंगणात उतरू नये यासाठी राजीनामा नाट्य रंगले. पण कोर्टाने केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर राजीनामा नाट्यावर पडदा पडला. आता ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके रिंगणात असल्यामुळे शिंदे गटाची मोठी पंचाईत झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा आहे; तर एकनाथ शिंदेंकडे फारसे कार्यकर्ते नाहीत. एवढेच नाही तर नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव असले तरी त्यांचे चिन्ह घराघरात पोहोचलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाला निवडणुकीला सामोरे जाणे धोक्याचे होते.

याबाबत गुरुवारी रात्री उशिरा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवू नये, असा आग्रह धरला. या मागची कारणेही स्पष्ट केली. त्यामुळे शिंदे यांनीही या निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीत उतरला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेत मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप उमेदवाराला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

ठाकरे सेना एकवटली! प्रचारात दोन्ही ठाकरेंसह खासदार-आमदार उतरणार

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सेना एकवटली आहे. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे सांगण्यात येत आहे; तर ही निवडणूक ठाकरे व भाजपसाठीही प्रतिष्ठेची आहे. लटके यांच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार, आमदार उतरणार आहेत. 18 ऑक्टोबरपासून प्रचाराचा धुमधडाका सुरू होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शिवसेनेचा आता धनुष्यबाण नाही तर मशाल चिन्ह असल्याचे पटवून सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पक्ष निवडणूक रिंगणात नसल्यामुळे शिवसैनिक व शिवसेनेच्या मतदारांमध्ये तितकासा घोळ निर्माण होणार नाही.

भाजपची प्रचाराची दिशा ठरली!

भाजप उमेदवारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्याशिवाय भाजप व शिंदे गटाचे मंत्री यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी या सभा आयोजित करून दिवसभर मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. या मतदारसंघात गुजराती व उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा मतदारांकडे भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे.

विधानसभा निकाल द़ृष्टिक्षेप

2014 : शिवसेना : 52,817, काँग्रेस 37,929. शिवसेना व काँग्रेसची एकूण मते : 90,746. भाजप : 47,338.
2019 : शिवसेना : 62,773, काँग्रेस : 27,951. शिवसेना व काँग्रेसची एकूण मते : 90,724. भाजप : 45,808.

Back to top button