मुंबई : ताटातूट झालेल्या बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट | पुढारी

मुंबई : ताटातूट झालेल्या बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  गोरेगाव येथील चित्रपट नगरीत सोमवारी सापडलेला बिबट्याच्या बछड्याची अखेर त्याच्या आईशी भेट झाली. बुधवारी सकाळी पावणे चार वाजता त्याची आई जंगलात पिंजर्‍यात ठेवलेल्या बछड्याला घेऊन गेली. चार आठवड्यांच्या बिबट्याच्या बछड्यावर सोमवारी सकाळी चित्रपट नगरी परिसरातील भटकी कुत्री भुंकत होती. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे बछडा भटक्या
कुत्र्यांच्या तावडीतून सुटला. बछड्याला सुरक्षारक्षकांनी संजय गांधी राष्ट्रीय  उद्यानातील अधिकार्‍यांच्या हवाली केले. वैद्यकीय
तपासणीत बछडा अशक्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला प्राणीरक्षकांनी औषधोपचार केले.

तासाभराने बछडा सापडलेल्या ठिकाणी अजून एका बिबट्याचा वावर सुरक्षारक्षकांना दिसला. बिबट्याची आई त्याला घेण्यासाठी आली होती, असा अंदाज वनाधिकार्‍यांनी बांधला. सोमवारी रात्री बछडा सापडलेल्या ठिकाणी आईशी बछड्याची भेट घडवून देण्याचा निर्णय वनाधिकार्‍यांनी घेतला. मोकाट कुत्रे आणि माकड यामुळे आई बछड्याजवळ येऊन निघून गेली. वनाधिकार्‍यांचा सोमवारी आई-बछड्याचा भेटीचा केलेला प्रयत्न फसला. गेल्यावर्षी आरेतील नागरिकांवर हल्ला करणार्‍या हल्लेखोर बिबट्याला पकडताना बछड्याची आई वनविभागाच्या पिंजर्‍यात चुकून अडकली होती. वनाधिकार्‍यांनी तिला सी-33 असे नाव दिले होते.

Back to top button