पोलीस आयुक्तालयात शिजला मनसुख हिरेन हत्येचा कट

पोलीस आयुक्तालयात शिजला मनसुख हिरेन हत्येचा कट
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मनसुख हिरेन च्या हत्येचा कट पोलीस आयुक्तालयात शिजला, असा खळबळजनक दावा एनआयएच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. हिरेनला बळीचा बकरा बनवले गेले. या संपूर्ण कटाची जबाबदारी घे, अशी गळ सचिन वाझेने हिरेनला घातली. मात्र असे करण्यास हिरेनने नकार दिला. त्यानंतर हिरेनला संपवण्याचा कट रचला गेला, असे एनआयएने म्हटले आहे.

हिरेनची हत्या ही आत्महत्या कशी भासेल या दृष्टीने तयारी करण्यात आली. तपास यंत्रणा आणि प्रसिद्धीमाध्यमे आपल्याला त्रास देत आहेत, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे, अशा आशयाचे पत्र हिरेनने लिहिले होते असा आभास सचिन वाझेने निर्माण केला. हिरेनला कसा मानसिक त्रास दिला जातोय हे सचिन वाझेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जाणीवपूर्वक सांगितले होते, असा उल्लेखही एनआयएच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

आरोपी सचिन वाझे याच्याच सूचनेनुसार गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांनी 17 फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलिसांत आपली स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. प्रत्यक्षात वाझेने स्वतः ती कार चालवली होती आणि आपल्या ठाण्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये आणली होती. वाझेने हीच गाडी नंतर गुन्ह्यात वापरली.

मात्र, त्यानंतर मनसुख हिरेन यांनी एका मर्यादेपलीकडे या षड्यंत्राचा भाग होण्यास नकार दिला. अँटिलियासमोर ही गाडी पार्क केल्याची जबाबदारी स्वीकारण्यास हिरेन यांनी स्पष्ट नकार दिला. परिणामी, मनसुख हिरेन हा कटातील दुवा कच्चा असल्याचे लक्षात येताच हिरेन याला संपविण्याचे ठरविण्यात आले.

वाझेनेच हिरेनच्या हत्येचादेखील कट रचला. यात त्याने इतर पाच जणांना सामील करून घेतले. प्रदीप शर्मा व गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी हिरेन हत्या कटाची अंमलबजावणी केली, असे सांगताना एनआयएच्या आरोपपत्रात मनसुख हत्येच्या संपूर्ण कटाचा पट उलगडण्यात आला आहे. तो असा-

मनसुख हिरेन हत्येपूर्वी म्हणजे 1 ते 4 मार्च या कालावधीत मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रचंड वेगाने हालचाली झाल्या. सचिन वाझे, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने यांच्यात बैठका झाल्या. हिरेन कसा दिसतो हे दाखवण्यासाठी आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वाझेने ही बैठक बोलावली होती.

याच कालावधीत हिरेनने मुंबई पोलीस आयुक्तालयात भेट दिली. 2 मार्च रोजी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात 10 मिनिटांची बैठक झाली. याच दिवशी मी आयुक्तांना भेटायला जातोय, तू खाली थांब, असे एका सहकार्‍याला सांगत प्रदीप शर्मा पोलीस आयुक्तांना भेटण्यास गेले.

प्रदीप शर्मा पीएस फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था चालवतात. या फाऊंडेशनच्या कार्यालयातही 3 मार्च रोजी शर्मा आणि वाझे भेटले. या भेटीदरम्यान सहआरोपी शिंदे उपस्थित होता. तो दुपारी साडेतीनच्या दरम्यान निघून गेला. त्यानंतर याचदिवशी सायंकाळी साडेसात ते आठ यावेळेत हिरेनला सोडण्यात आले.

खुनाची जबाबदारी शर्मावर

मनसुख हिरेनचा खून करण्याची जबाबदारी प्रदीप शर्मा यांना देण्यात आली. त्यासाठी वाझेने प्रदीप शर्मा यांना मोठी रक्कम दिली होती. हे काम घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का, असे विचारले. शेलारने हो म्हटले. 3 मार्च रोजी वाझे पुन्हा एकदा शर्मा यांना भेटले आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग दिली, ज्यात 500 रुपयांच्या नोटा होत्या. पैसे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शेलारला फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्मा यांना या वाहनाचा वापर करायचा होता.

सचिन वाझे पुन्हा एकदा अंधेरीत चकाला येथे सुनील मानेला भेटला. यावेळी त्याने बुकी नरेश गौरकडील सिमकार्ड आणि मोबाईल हँडसेट मानेला दिला. या सिमकार्डमध्ये काही तांत्रिक बिघाड असावा. त्यामुळे सुनील माने 3 मार्च रोजी सचिन वाझेच्या कार्यालयात गेला आणि सिमकार्ड तसेच मोबाईल फोन परत केला. वाझे त्याच दिवशी पुन्हा मानेला चकालामध्ये भेटला आणि नवा मोबाईल आणि सिमकार्ड त्यास दिले.

तावडेचे नाव घेऊन मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात यायला सांगा. तेथे मनसुखला संतोष शेलारकडे सोपवले जाईल, असे वाझेने मानेला सांगितले. ठरल्याप्रमाणे, 4 मार्च रोजी संध्याकाळी सुनील मानेने मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. हिरेन त्याला ठाण्यात भेटायला तयार झाला. हिरेन भेटल्यानंतर मानेने त्याला शेलारकडे सोपवले. शेलार हा मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह तवेरा गाडीत हिरेनची वाट पाहात होते. या लोकांनी हिरेनची गाडीमध्येच हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकून दिला.

मुंब्य्राच्या खाडीतून हिरेनचा मृतदेह ताब्यात घेऊन 5 मार्च रोजी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यावेळी कळवा रुग्णालयात जाऊन सचिन वाझेने या पोस्टमॉर्टम अहवालासंदर्भात डॉक्टरांकडून माहिती घेतली होती, असे डॉक्टरांनी एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

कटाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देताच शिजला हिरेनच्या हत्येचा कट

या संपूर्ण प्रकरणात मनसुख हिरेनला बळीचा बकरा बनवले गेले. या संपूर्ण कटाची जबाबदारी घे, अशी गळ सचिन वाझेने हिरेनला घातली. मात्र असे करण्यास हिरेनने नकार दिला. त्यानंतर हिरेनला संपवण्याचा कट रचला गेला, असे एनआयएने म्हटले आहे.

हिरेनची हत्या ही आत्महत्या कशी भासेल या दृष्टीने तयारी करण्यात आली. तपास यंत्रणा आणि प्रसिद्धीमाध्यमे आपल्याला त्रास देत आहेत, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे, अशा आशयाचे पत्र हिरेनने लिहिले होते असे सचिन वाझेने भासवले. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हिरेनला कसा मानसिक त्रास दिला जातोय हे सचिन वाझेने जाणीवपूर्वक सांगितले होते, असा उल्लेखही एनआयएच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

मुंब्य्राच्या खाडीतून हिरेनचा मृतदेह ताब्यात घेऊन 5 मार्च रोजी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यावेळी कळवा रुग्णालयात जाऊन सचिन वाझेने या पोस्टमॉर्टम अहवालासंदर्भात डॉक्टरांकडून माहिती घेतली होती, असे एनआयएला डॉक्टरांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

मुंबई पोलीस मुख्यालयात 1 ते 4 मार्च या कालावधीत प्रचंड वेगाने हालचाली झाल्या, असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे. सचिन वाझेसह या प्रकरणात आरोपी असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने यांचा कटासंबंधी झालेल्या बैठकांमध्ये समावेश होता. याच कालावधीत हिरेनने मुख्यालयात भेट दिली होती. 2 मार्च रोजी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात याच मुख्यालयात 10 मिनिटांची बैठक झाली. याच दिवशी मी आयुक्तांना भेटायला जातोय, तू खाली थांब, असे प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या एका सहकार्‍याला सांगितले होते.

प्रदीप शर्मा एक स्वयंसेवी संस्था चालवतात. त्यांच्या कार्यालयात 3 मार्च रोजी शर्मा आणि वाझे यांची भेट झाली, असाही उल्लेख या आरोपपत्रात आहे. या भेटीदरम्यान या प्रकरणातील सहआरोपी शिंदे उपस्थित होता. तो दुपारी साडेतीनच्या दरम्यान निघून गेला. त्यानंतर याचदिवशी सायंकाळी साडेसात ते आठ यावेळेत हिरेनला सोडण्यात आले, असा दावा एनआयएने केला आहे.

अ‍ॅन्टिलियासमोर स्फोटकांची गाडी ठेवण्याच्या कटापासून ते या कटाचा साक्षीदार राहिलेल्या मनसूख हिरेनच्या हत्येपर्यंतचे सर्व धागे एनआयएने आपल्या जम्बो आरोपपत्रात जुळवलेले दिसतात. आता हे आरोपपत्र न्यायालयात सिद्ध करण्याचे मोठे आव्हान एनआयएसमोर आले. त्यासाठी लागणार्‍या पुराव्यांचा तपशील तूर्त उघड झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news