ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव | पुढारी

ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी नियमानुसार दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे कर्मचारी सेवा नियमांचे पालन करूनही त्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाही. हा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के पूर्व विभागात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाकडून निश्चित झाले आहे. सरकारी अथवा निमसरकारी कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍याला कोणतीही निवडणूक लढवायची झाली तर, कर्मचारी सेवा नियमानुसार त्याला सर्वप्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार ऋतुजा यांनी आपला राजीनामा पालिकेच्या कर्मचारी विभागाकडे दिला. महापालिका नोकरीमध्ये त्यांना 14 वर्षे झाल्यामुळे त्या स्वेच्छानिवृत्तीसाठी पात्र ठरत नाही. म्हणजे स्वेच्छानिवृत्तीचे लाभ सोडून त्यांनी राजीनामा दिला. पालिका कर्मचारी सेवा नियमानुसार किमान एक महिना आधी राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र ऋतुजा लटके आणि चार-पाच दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यामुळे त्यांनी पालिका नियमानुसार सोमवारी एक महिन्याचा 67 हजार 590 रुपये पगार पालिकेच्या कोषागृहामध्ये जमा केला. दुसर्‍या एका नियमानुसार ऋतुजा लटके यांनी आपला पगार जमा केला नसता तरी त्यांना मिळणार्‍या अन्य देयकामधून हा पगार वळता करण्याची तरतूद आहे. लटके यांनी कर्मचारी सेवानियमांचे पूर्ण पालन केलेले असतानाही त्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाही.

शिंदे-भाजपचा दबाव

लटकेंचा राजीनामा का मंजूर करण्यात येत नाही, याचा जाब स्वतः शिवसेना नेते अनिल परब यांनी पालिका आयुक्तांना विचारला. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ऋतुजा लटके यांना लढवता येऊ नये यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

राजीनामा मंजूर झाला नाही तर, लटके निवडणूक रिंगणात उतरू शकणार नाही. यासाठीच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर दबाव टाकत असल्याचे समजते. यामागे भाजपही असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाची संपर्क साधला असता तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

लटके यांची मुले निवडणूक लढवण्यासाठी पात्र नाहीत !

दिवंगत आमदार रमेश लटके यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा 25 वर्षे असणे आवश्यक आहे. पण लटकेंच्या मुलाचे वय 22 तर मुलीचे वय 19 वर्षे असल्यामुळे ते विधानसभेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे लटके परिवाराला पोटनिवडणुकीसाठी दूर ठेवण्यासाठी भाजप व शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button