मशाल आणि शिवसेनेचे नाते जुनेच | पुढारी

मशाल आणि शिवसेनेचे नाते जुनेच

मुंबई; दिलीप सपाटे : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आले असून शिवसेना आणि मशाल या चिन्हाचे जुनेच नाते आहे. या चिन्हानेच शिवसेनेला सत्तेची आणि विजयाची वाट दाखवली होती. या चिन्हानेच मुंबई महापालिकेत आणि विधानसभेत पहिल्यांदा शिवसेनेला सत्तेची वाट दाखवली होती.

1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना आधी नोंदणीकृत पक्ष नव्हता. यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणूनच होत असे. 1968 मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल-तलवार या चिन्हावर लढवली होती. 1980 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर 1985च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅट-बॉल अशी वेगवेगळी चिन्हे मिळाली होती. 1985 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांनी धगधगती मशाल हे चिन्ह घेतले होते. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ताही आली होती. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेला विधानसभा आणि मुंबई महापालिकेत यशाचा मार्ग दाखवणारे ठरले.

1989 मध्ये निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची नोंद झाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. गेली 33 वर्षे शिवसेना हे चिन्ह अभिमानाने मिरवत होती. ते आता गोठविण्यात आले आहे. त्याचवेळी शिवसेनेला जुने चिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला सामोरे जाणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवून उद्धव ठाकरे हे इतिहासाची पुनरावृत्ती करतात का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

छगन भुजबळ यांनी विधानसभेची निवडणूक लढविली ती धगधगती मशाल या चिन्हावर! ते या चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून विधानसभेत गेले होते.

Back to top button