मुंबई : बँकेच्या माजी मॅनेजरला 18 लाखांचा गंडा; अश्लील व्हिडीओप्रकरणी धमकी देऊन फसवणूक

मुंबई : बँकेच्या माजी मॅनेजरला 18 लाखांचा गंडा; अश्लील व्हिडीओप्रकरणी धमकी देऊन फसवणूक
Published on
Updated on

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  ब्लॅकमेल करून बँकेच्या निवृत्त मॅनेजरला सुमारे 18 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार वांद्रे
परिसरात उघडकीस आला आहे. अश्लील व्हिडीओप्रकरणी अटकेची, सोशल मीडियावरील व्हायरल झालेले व्हिडीओ डिलीट करणे तसेच तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगून या व्यक्तीनी बँक मॅनेजरची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तोतयागिरी करून खंडणीसह फसवणूक करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी समांतर तपास करत आहेत. 64 वर्षांचे तक्रारदार हे वांद्य्रात राहतात. तीन वर्षांपूर्वी ते एका खासगी बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. 20 सप्टेंबरला ते घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. मेसेज पाठवणार्‍या तरुणीने तिचे नाव पूजा शर्मा असून ती गुजरातच्या सुरत शहरात राहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर
त्यांच्यात चॅटींग सुरू झाले होते. चॅट सुरू असताना काही वेळाने तिने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. त्यांनी तो कॉल घेतला असता समोर एक महिला अर्धनग्न अवस्थेत होती. ती त्यांच्याकडे पाहून अश्लील वर्तन करत होती. या प्रकारानंतर त्यांनी तो कॉल बंद केला.
त्यानंतर काही वेळात त्यांना त्यांचा तो व्हिडीओ कॉल व्हॉट्सअ‍ॅपवर आला होता.

अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून दहा हजारांची मागणी करून पैसे दिले नाही, तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मात्र त्यांनी त्याला पैसे दिले नाहीत. दुसर्‍या दिवशी त्यांना विक्रम राठोड  नाव सांगणार्‍या एका व्यक्तीने फोन
करून तो दिल्लीच्या सायबर सेलमध्ये कामाला असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर
अटकेची कारवाई होणार, अशी धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी त्याने त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने त्यांनी त्याला साडेसोळा लाख रुपये दिले होते. ही रक्कम  त्याने वेगवेगळ्या बँक खात्यांत  ट्रान्सफर  केली होती. त्यानंतर त्याने त्यांना पुन्हा
फोन करून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तसेच व्हिडीओमधील तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या वडिलांना पैसे दिले नाही, तर त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केलप्रकरणी गुन्हा दाखल होईल अशी भीती दाखवून आणखी पैशांची मागणी केली होती. या प्रकारानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

सध्या भामटे ऑनलाईन फ सवणुकीसाठी विविध फं डे वापरत आहेत. यात सध्या सोशल मीडियावरून विशेषत… फेसबुकवर मैत्री
करून व्हीडिओ कॉलवर अश्लील कृत्ये करून तो व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गंडवणे हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागला आहे. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड  रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. तसेच अशा धमक्या आल्यास डगमगून न जाता पोलिसांत तक्रार नोंदवणे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news