जागतिक टपाल दिन विशेष : तंत्रज्ञानाच्या युगातही पोस्टाने जपली विश्वासार्हता | पुढारी

जागतिक टपाल दिन विशेष : तंत्रज्ञानाच्या युगातही पोस्टाने जपली विश्वासार्हता

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आधुनिकतेच्या जमान्यात टपालाचे पत्र कालबाह्य होवू लागले आहे. पूर्वी ख्याली खुशाली कळवायची म्हटलं की, पत्रा शिवाय पर्याय नसायचा. मात्र आता काळ बदलला आणि सोशल मीडियाचा जमाना आला. त्यामुळे पोस्टाच्या पत्रातील सप्रेम नमस्कार, विनंती विशेष हा मायना नव्या पिढीला अपवादानेच माहिती आहे. असे असले तरी बदलत्या जमान्यात काळानुरुप बदलाचे आव्हान टपाल विभागाने स्वीकारुन नव नवे उपक्रम हाती घेतले आहेत.

सन 1969 सालापासून दि. 9 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय टपाल दिन पोस्ट विभागामार्फत साजरा केला जात आहे. भारतात 1854 मध्ये कोलकाता येथून अधिकृत टपाल सेवा सुरु झाली. आजच्या युवापिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटींग्जचे महत्व भासत नाही. एकेकाळी नागरिकांसाठी पत्र म्हणजे सर्वकाही होते. गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाईफ लाईन होती. टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

पत्रास कारण की… या वाक्याने सुरूवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळवायची. पोस्टमन काका आल्यास त्याच्यामागे धावत धावत आमचं पत्र आलं का? असा प्रश्न विचारायचा. त्या 15 पैशाच्या पत्रातून खूप आनंद मिळत होता. मात्र काळाच्या ओघात आता ही पत्रे इतिहास जमा झाली आहेत. पूर्वी एखादा टेलिग्राम (तार) आली तेव्हा एक संकेत असायचा काहीतरी वाईट घडले आहे. आणि एखादे पत्र आले की घरातील मंडळी समजून जायची की आनंदाची बातमी आहे. मात्र गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पत्राचा वापर कमी झाला आहे. आज पत्राची जागा ई मेल, सोशल मीडियाने घेतली आहे. घरातील नागरिक नोकरीनिमित्ताने कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर असले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबाशी संवाद साधत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागरिक आधुनिक झाला. भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पत्रव्यवहारापुरते मर्यादीत न राहता इतर सेवाही लागू करण्यास पोस्टाने सुरुवात केली आहे. नवतंत्रज्ञानाची जोड देवून पोस्टाने सुरु केलेल्या बँकिंग सेवेला ग्राहकामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पत्रव्यवहार, इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर, इंटरनॅशनल मनी ट्रान्स्फर, मनिग्राम या सेवाबरोबरच बँकिंग, विमा बचत बँक, आरडी, मुदतठेव, वरिष्ठ नागरिक योजना, मंथली इन्कम स्कीम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजना पोस्टाने सुरु केल्या आहेत.त्याचबरोबर पोस्टाची ग्रामीण डाक जीवन विमा सेवाही महत्वकांक्षी ठरत आहे.

पोस्ट सेवेला नागरिकांची पसंती…

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर आणि मोबाईलवरून संदेश वाहन काही सेकंदात जगाच्या कानाकोपर्‍यात करता येते. मात्र प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध असली तरी आजही महत्वाची कागदपत्रे, पेन्शन पोहोचवण्याचे काम पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून पार पाडले जात आहे. नागरिकांकडून पोस्टाच्या सेवेला मोठ्या विश्वासाने पसंती दिली जात आहे. आपल्या सेवेतून लोकांचा विश्वास संपादन करणार्‍या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर हा स्थापना दिवस, हा दिवस जागतिक टपाल दिन किंवा वर्ल्ड पोस्ट डे म्हणून साजरा केला जात आहे.

Back to top button