Eknath Shinde Dasara Melava : गद्दारी २०१९ मध्‍येच झाली, आम्‍ही जनतेसाठी उठाव केला : एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर डागली तोफ | पुढारी

Eknath Shinde Dasara Melava : गद्दारी २०१९ मध्‍येच झाली, आम्‍ही जनतेसाठी उठाव केला : एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर डागली तोफ

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेली दोन महिन्‍यांमध्‍ये गद्दार आणि खोके हे दोनच शब्‍द ऐकावत आहात. गद्दारी झाली आहे; पण गद्दारी झाली ती २०१९ मध्‍ये झाली. तुम्‍ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले. खरे गद्दार कोण हे आता जनतेला कळाले आहे. शिवसेना ही तुमची प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेना ही अनेकांच्‍या घामातून निर्माण झालेली संघटना आहे. तुम्‍हाला ही तुमच्‍या दावणीला बांधता येणार नाही. आम्‍ही जनतेसाठी उठाव केला, अशा शब्‍दांमध्‍ये मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्‍यावर तोफ डागली. (Eknath Shinde Dasara Melava)

शिंदे गटाचा दसरा मेळावा आज बीकेसी मैदानावर पार पडला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत भाजपसह सत्तांतर घडवले. गेले चार महिने हे दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यातील भाषणात कोणती नवी हत्यारे उपसली जातात, याबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्‍यावर हल्‍लाबोल केला.

तुम्‍ही वैचारिक व्‍यभिचार केलात, आम्‍ही क्रांती केली

आम्‍हाला गेल्‍या दोन महिन्‍यांमध्‍ये गद्‍दार आणि खोके हे दोन शब्‍द ऐकावत आहोत. गद्‍दारी झाली आहे; पण गद्दारी झाली ती २०१९ मध्‍ये झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांशी तुम्‍ही गद्दारी केली. शिवसेनेला मते दिलेल्‍यांशी तुम्‍ही गद्दारी केली. विधानसभा निवडणुकीत तुम्‍ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकारे यांचा फोटाे वापरलात. युती म्‍हणून निवडणूक लढवली आणि निकालानंतर काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीबरोबर आघाडी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तुम्‍ही विकलात. तुम्‍ही वैचारिक व्‍यभिचार केला आहे. तुम्‍ही भरकटला. महाराष्‍ट्रातील जनता तुम्‍हाला कधीच माफ करणार नाही. शिवतीर्थावर जावून बाळासाहेब ठाकरे यांची प्रथम माफी मागा. मगच आमच्‍यावर बोला, असे आवाहनही त्‍यांनी केले. आम्‍ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्‍ही गद्दारी नाही तर क्रांती केली आहे, असेही ते म्‍हणाले.

Eknath Shinde Dasara Melava : तुम्‍ही सत्तेसाठी लाचार झालात

तुम्‍ही बाळासाहेबांचे विचार विकले. खरे गद्दार कोण हे आता जनतेला कळाले आहे. आज या दसरा मेळाव्‍याला  झालेली गर्दी पाहा. आम्‍ही बाळासाहेबांच्‍या विचारांशी कायम आहोत. तुम्‍ही सत्तेसाठी लाचार झालात. तुम्‍ही हिंदुत्त्‍ववादी राजकारणाची चूक केली, असे विधान  तुम्‍ही विधानसभेत केले. हे विधान तुम्‍ही करताना तुम्‍हाला काहीच वाटले नाही का, असा सवालही त्‍यांनी केला.

मविआ सरकारला सुरुवातीपासून विरोध

मविआ सरकार बनत होते तेव्‍हा अनेक आमदार सांगत होते की, ही आघाडी महाराष्‍ट्राचे अधोगती करणारी आहे. त्‍यावेळी आम्‍ही अन्‍याय सहन करत तुमचा निर्णय मान्‍य केला. मात्र जेव्‍हा तुम्‍ही बाळासाहेबांचा विचार सोडला तेव्‍हा आम्‍हाला निर्णय घ्‍यावा लागला. आम्‍ही जनतेसाठी उठाव केला, असेही शिंदे म्‍हणाले.

आत्‍मपरिक्षण करा

तुम्‍ही पाच वर्ष मुख्‍यमंत्रीपद टिकविण्‍यासाठी शिवसेनेचे पानिपत केले. गेली अडीच वर्षांची खदखद होत होती. तुम्‍हाला आम्‍ही आमची व्‍यथा सांगितली. मात्र तुम्‍ही दुर्लक्ष केले. तुम्‍हाला ५० आमदारांनी का सोडले, १२ खासदारांनी तुमची साथ का सोडली. यापूर्वी राज ठाकरे, नारायण राणे यांनीही तुम्‍हाला सोडले होते. तुम्‍ही आत्‍मपरिक्षण करा, असे आवाहनही त्‍यांनी केली.

सगळं बंद मात्र तुमची दुकाने सुरु राहिली

एकनाथ शिंदे हा दिवसरात्र जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्‍ही आज म्‍हणताय, निवडणुकीला सामोरे जा. मात्र २०१९ ला तुम्‍ही काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीबरोबर आघाडी करताना राजीनामा का दिले नाही, असा सवाल करत तुम्‍ही गेल्‍या अडीच वर्षांत केवळ अडीच तास मंत्रालयात गेला. कोरोनाच्‍या नावाखाली सर्वांना घरात डांबले, मात्र तुमची दुकाने सुरु होती, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.

सेनेचा झेंडा आणि राष्‍ट्रवादीच्‍या अजेंडा

तुम्‍ही मुख्‍यमंत्रीपद कायम ठेवण्‍यासाठी विचारांशी गद्दारी केली. सेनेचा झेंडा आणि राष्‍ट्रवादीच्‍या अजेंडा असा मंत्रालयात कारभार होता. काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी शिवसेना संपवायला निघाले तरी तुम्‍ही मुख्‍यमंत्रीपद टिकविण्‍यासाठी सर्व तडजोडी स्‍वीकारल्‍या. काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीला वाईट वाटेल म्‍हणून तुम्‍ही ‘पीएफआय’ कारवाई झाले तरी तुम्‍ही का बोलला नाही, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.

विचाराचे खरे वारसदार कोण हे विराट गर्दीने स्‍पष्‍ट केले

राज्‍यातील कानाकोपर्‍यांतून शिवसैनिक आजच्‍या विराटसभेला उपस्‍थित राहिले. यामुळेच मी आज तुमच्‍यासमोर नतमस्‍तक झालो. मी मुख्‍यमंत्री असलो तरी तुमच्‍यातीलच एक कार्यकर्ता आहे. आम्‍ही बाळासाहेब ठाकरे यांच्‍या हिंदुत्त्‍वाच्‍या भूमिकेला हा पार्ठिबा असल्‍याचा हा पुरावा आहे. येथे अनाथ जनसागर उसळला आहे. खरी शिवसेना कोठे आहे, याचे उत्तर उपस्‍थित महासागरानेच दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचाराचे खरे वारसदार कोठे आहेत, या प्रश्‍नाचे उत्तरही या गर्दीने सिद्‍ध केले आहे, असेही शिंदे म्‍हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्‍याबरोबर

तुम्‍ही न्‍यायालयात जावून शिवाजी पार्क मैदान मिळवले. मी कधीच यामध्‍ये हस्‍तक्षेप केला नाही. मैदानही आम्‍हाला मिळालं असते. परंतू या राज्‍याचा मुख्‍यमंत्री म्‍हणुन कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍याची जबाबदारी माझ्‍यावर आहे. मैदान जरी तुम्‍हाला मिळाले तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्‍याबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांनाच तिलांजली दिली. तुम्‍हाला त्‍या मैदानावर उभे राहून बोलण्‍याचा अधिकार आहे का. तुम्‍ही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी बरोबर आघाडी केली. तुम्‍ही या दोन पक्षांच्‍या तालावर चालत होता. युती सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंकडे होता. मात्रा मविआ सरकारचा रिमोट कंट्रोल हा काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीकडे होता, असा आरोपही त्‍यांनी केला.

बाळासाहेब ठाकरेंच्‍या विचारांचे खरे वारसदार आम्‍हीच

संपूर्ण राज्‍यातून आमच्‍या भूमिकेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्‍ही जे केले ते उघडपणे राज्‍याच्‍या हितासाठी आणि शिवसेनेसाठी केले. ही शिवसेना फक्‍त आणि फक्‍त बाळासाहेब ठाकरे यांची आणि सर्व शिवसैनिकांची आहे. आम्‍हाला सत्तेपेक्षा सत्‍य आणि सत्त्‍व महत्त्‍वाचे आहे. सत्तेसाठी आम्‍ही लाचार झालो नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचाराचे खरे वारसदार हे शिवसैनिक आहे. वारसा हा विचारांचा असतो. आम्‍ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा जपला आहे, असेही त्‍यांनी ठणकावले.

आरएसएसवर बंदी घाला ही मागणी हास्‍यास्‍पद

‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्‍यानंतर काहींनी ‘आरएसएस’वर बंदी घ्‍याला, अशी मागणी काहींनी केली. ही मागणीच हास्‍यास्‍पद आहे. आरएसएस ही प्रखर राष्‍ट्रप्रेमी संघटना आहे. या संघटनेचे कार्य मोठे आहे, असेही ते म्‍हणाले.

चहावाल्याची तुम्ही खिल्ली उडवत होता

अरे आमदार गेले तरीही यांचे डोळे उघडत नाहीत. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत वाही का? पानटपरीवाल्याचा मुलगा आमदार होऊ शकत नाही का? ही सगळी तुमची जहागीर आहे. ही जहागीर आता आम्ही मोडून टाकली आहे. चहावाल्याची तुम्ही खिल्ली उडवत होता, तो चहावाला आता कुठे आहे बघा. मोदी परदेशात जातात, तुम्ही पाहू शकता. त्यांचं कार्य किती प्रखर आहे. आता मोदींनी आपल्या व्यक्तीमत्वाची जगावर भुरळ घातली आहे. या देशाचा प्रधानमंत्री त्याची तुम्ही टिंगल करत आहात.

अमित शहा यांच्यावर टीका तुम्ही करत होता

अमित शहाला तुम्ही अफझलखान म्हणत आहात त्यांनी जम्मू काश्मीर मधील सुधारणेवर भर दिला. राममंदिर हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते स्वप्न यांनी पूर्ण केलं, त्यांनाच तुम्ही नावं ठेवत आहात. राणेंसारख्या व्यक्तीला तुम्ही जेवत असलेल्या ताटावरून उठवलं तुम्ही, का? तुम्ही मला कंत्राटदार म्हणत आहात, होय मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. विकासाचा ध्यास घेतलेला, राज्याचा विचार करणारा मी मुख्यमंत्री आहे.

आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होतो

मी तुमच्या सरकारमध्ये होतो, आम्ही सर्व काही पाहत होतो. पण योग्य वेळी आल्यावर आम्ही ते दाखवून दिलं आहे. तुमच्यातील आणि माझ्यातील बोलणं काय झालं होते मी आता नाही सांगणार. वेळ आली की सर्व काही सांगेन. तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला विरोध का नाही केला? असा सवाल त्यांनी यावेळी केला. सावरकर हे आमचे दैवत आहे. आघाडीत सर्वाच्या विचारांचा आदर करावा लागतो. आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होतो. हे आमचं दुर्दैव आहे.

वर्क फ्रॉम होम संकल्पना  मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी केली

ज्या काँग्रेसला बाळेसाहेबांनी विरोध केला त्यांच्या भारत छोडो यात्रेत तुमचे लोक सामील होतात. आपल्या बाळासाहेबांनी लोकांचं प्रेम गमावलं नाही. त्यांना लोकांनी भरभरून प्रेम दिले. पण आता काय स्थिती आहे? सत्ता गेल्यावर सगळं सुचायला लागले यांना. सगळ्यांना पदे देण्यास सुरूवात केली. आता सगळ्या भेटीगाठी सुरू गेली. याआधी माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळली. वर्क फ्रॉम होम संकल्पना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी असताना चालू ठेवली. अशी खोचक टीका शिंदे यांनी यावेळी केली.

दुष्काळ, पूर यासारखी परिस्थिती आम्ही पाहीली आहे. काय परिस्थिती होती त्यावेळी माहिती आहे का? किती पाणी खोल आहे हेतरी माहिती आहे का? हा एकनाथ शिंदे स्वत: जाऊन ती परिस्थिती पाहीलेला माणूस आहे. आजार, साथीचे रोग पसरलेले, गुरांची परिस्थिती वाईट होती. कोविडमध्ये तर मी स्वत: पीपीई कीट घालून ररूग्णालयात गेलो होतो. सिविल सर्जनी मला नको म्हणत असताना देखील मी ती पीपीई कीट घालून काम केले आहे.

कटप्पा दुटप्पी राजकारणी नव्हता. माझ्या दीड वर्षांच्या नातवावर टीका करत आहात. कुठे फेडाल हे पाप? निवडणूका आल्या की मराठी माणूस तुम्हाला आठवतो. पण माझे सरकार अन्याय करणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी दाखवला.

हेही वाचा

Back to top button