Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्‍या भाषणातील १० ठळक मुद्दे | पुढारी

Dasara Melava : उद्धव ठाकरे यांच्‍या भाषणातील १० ठळक मुद्दे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. गेले चार महिने ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत राज्यभर प्रचंड कुतूहल होते. जाणून घेवूया उद्धव ठाकरे यांच्‍या भाषणातील ठळक १० मुद्दे…

१. मिंदे गट गद्दारच

यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी गद्दारांना गद्दारच म्हणणार आहे. भले आत्ता त्यांच्या बुडला मंत्री पद चिकटले असेल पण, त्यांच्यावरील गद्दाराचा शिक्का या जन्मी तरी मिटणार नाही.

२. यावेळचा रावण वेगळा

सभेत शिवसेनापक्ष प्रमुख म्हणाले, यावेळचा रावण वेगळा आहे. काळ बदलत चालला आहे तसा रावण बदलत चालला आहे. हा रावण खोक्यांचा रावण आहे. हा खोक्यासुर आहे. हे तुम्हाला माहित आहे.

३. कटाप्पाने कट रचला

यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांचावर विश्वास ठेवला त्यांना कटाप्पाची उपमा दिली. सभेत ठाकरे म्हणाले, मी ज्यांचावर विश्वास ठेवाला ते कटाप्पा माझ्या आजार पणात मी अंथरुणाला खिळलेलो होतो तेव्हा कधीच उठणार नाही असे बघून माझ्या माघारी कट रचायला सुरुवात केली. पण, आई जगदंबेच्या कृपेने मी पुन्हा उठलो. मी यांना सगळं दिलं, यांना मंत्रीपदे दिली आणि हे कटाप्पा निघाले हे गद्दार निघाले. ज्यांना मी काहीच दिले नाही ते आज माझ्या सोबत आहेत. हेच माझे खरे शिवसैनिक आहेत.

४. पक्षप्रमुख होण्याची आशा

मुख्यमंत्री एकनाथ यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना पक्षप्रमुख होण्याची स्वप्न पडत आहेत. त्यांना पक्षप्रमुख व्हायचे आहे. तुम्ही त्याला पक्षप्रमुख करणार का? जो दुसऱ्याचा बाप चोरतो तो काय पक्षप्रमुख होतो. अरे स्वत:च्या बापाचा तरी विचार करायचा त्याला काय वाटेला माझा मुलगा दुसऱ्याचा बापाचे नाव लावतोय अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी यावेळी केली.

५. मी टोमणा मारत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात मी टोमणे मारतो, मी टोमणे मारत नाही जे खरं आहे तेच मी बोलतो आहे. ते म्हणत होते की परत येणार, परत येणार, ते परत आले आणि दीड दिवसाचा गणपती होऊन गेले आणि आता पुन्हा यायला मिळेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून आले आहेत. मी कोणावर टोमणे बाजी करत नाही मी जे सत्य आहे तेच बोलतो.

६. कायद्याचं राज्य

आम्हाला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री कायद्याचे पालन करा अशी भाषा वापरतात. आम्ही कायद्याचे पालनच करतो आहोत. इथे सगळी जनता शांत आहे मी सांगितले आहे म्हणून ती शांत आहे. आम्ही कायद्याचे पालन करतो आहेच. पण, तुम्ही काय करताय पोलिसांकडून धमकी देत मिंद्दे गटात जाण्यासाठी खऱ्या शिवसैनिकावर दबाब आणला जातोय. ही कायद्याची भाषा आहे का? पोलिसांकडून मिंद्दे गटात ये अन्यथा तुझी जुनी केस काढून तुला जेलमध्ये सडवतो अशी धमकी दिली जात आहे, ही कायद्याची भाषा आहे का याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे तुमचे असले कायद्याचे राज्य असेल तर तो आम्ही पाळणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी रोख ठोकपणे सभेत ठणकावले.

७. हिंदुत्त्व सोडलं नाही

हे आम्हला आता हिंदुत्त्व शिकवायला आले आहेत. आम्ही हिंदुत्त्ववादीच आहोत आणि भाजपकडून आम्हला हिंदुत्त्व शिकायची काय गरज. हिंदुत्त्व काही धोतर नाही असा टोमणा यावेळी ठाकरे यांनी लगावला. भाजप हिंदुत्त्व म्हणून गाईचे नाव घेते या भाजपनं थोड महागाईवर बोलावं, या भाजपने गरिबी, महागाई, बेकारी, विषमतावर बोलावं. हिंदुत्त्व आणि गाईच्या नावावर हे या महागाईसारख्या प्रश्नावरु भरकटवत आहे.

८. देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरमंत्री 

या राज्यात जा, त्या राज्यात जा, हे सरकार पाडा, ते सरकार पाडा असे हे गृहमंत्री अमित शाह यांचे काम चालेले आहे. हे देशाचे गृहमंत्री आहेत की घरमंत्री असे म्हणत अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. ते मुंबईत येतात आणि आम्हाला जमीन दाखवा म्हणतात. पण, आम्हाला पाकव्याप्त काश्मीरची जमीन दाखवा, चीन अरुणाचलमध्ये घुसला आहे तेथे जा आणि ती जमीन घेऊन दाखवा. हे माझे शिवसैनिक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील जेव्हा तुम्ही पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवाल, असे देखील ठाकरे म्हणाले.

९. दिल्लीला कुर्निसात करणारे मिंदे सरकार

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका करत भाजपवाले राज्यातील सगळे उद्योग आणि प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत आणि हे मिंदे सरकार खाली माना घालून बसले आहेत अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. हे मिंद्दे सरकार १०० दिवसात ९० दिवस दिल्लीला गेले, कशाला तर दिल्लीला कुर्निसात करायला जाता काय? असा सवाल देखील यावेळी ठाकरे यांनी केला.

१०. भाजपचं बेगडी हिंदुत्त्व

शिवसेना प्रमुखांनी आमचं हिंदुत्त्व शेंडी दांडीशी निगडीत नाही तर ते देशाशी निगडीत नाही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवावं आणि हा देशाला आपला धर्म म्हणावं आणि जर कोणी आपला धर्म रस्त्यावर आणला तर आम्ही कडवट हिंदुत्त्व होऊन रस्त्यावर उतरायला कमी करणार नाही. तुमचं हिंदुत्त्व म्हणजे सर्व हिंदु देशप्रमी आणि इतर धर्मीय दहशतवादी असं आहे, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली. पाकिस्तानात जावून जीनाच्या थडग्यावर डोके ठेवणाऱ्यांनी, पाकिस्तानात जावून त्याचा केक खाणाऱ्यांनी, मुफ्ती मोहम्मद यांच्याशी काश्मीरमध्ये युती आणि बिहारमध्ये नितीश सोबत युती करणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्यात दिला.

मेळाव्यातील इतर महत्त्वाचे मुद्दे

  • मोहन भागवत मशिदीत का गेले

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा आदर करतो असे म्हणत ते दिल्लीत मशिदीत का गेले असे म्हणत त्याचे कारण सांगितले. मोहन भागवत मुस्लीमांशी संवाद साधण्यासाठी मशिदीत गेले. मुस्लीमांनी भागवतांना राष्ट्रपिता म्हटलं. तर उद्धव ठाकरे यांनी वेळी आम्हीच मोहन भागवत यांना राष्ट्रपती पदासाठी उभे करा असे म्हटले होते असे ही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

  • भाजप देशात हुकूमशाही आणत आहे

भाजप देशात हुकूमशाही आणत आहे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देशात भाजप हुकूमशाही आणू पहात आहे याचा पुनरुच्चार केला. भाजपचे अध्यक्ष नड्डा शिवसेना शिल्लक राहणार नाही असे म्हणत आहेत. म्हणजे यांना देशात कोणताच पक्ष ठेवायचा नाही. फक्त भाजप एकच पक्ष ठेवायचा आहे. इतर सर्व पक्षांना संपवून देशातील लोकशाही संपवायचा डाव भाजपचा आहे. देशात हुकूमशाही आणून तुम्हाला पुन्हा एकदा गुलामगिरी ढकलायचे आहे आणि हेच यांच हिंदुत्त्व आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी सभेत केली.

Back to top button