54 टक्के वैमानिकांना दिवसा झोपेचा आजार | पुढारी

54 टक्के वैमानिकांना दिवसा झोपेचा आजार

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  भारतीय वैमानिकांबद्दल केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती हाती आली आहे. 54 टक्के वैमानिक कोणत्याही नियोजनाविना म्हणजेच सोबत असलेल्या दुसर्‍या वैमानिकाची परवानगी न घेताच दिवसा झोपी जात असल्याचे उघड झाले आहे.

542 भारतीय वैमानिकांचा सर्व्हे करण्यात आला. यापैकी 358 वैमानिक दिवसा झोपी जात असल्याचे आढळून आले. हे सर्व वैमानिक घरगुती, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करतात. 54 टक्के वैमानिक अधिक वेळ झोपतात तर 41 टक्के काही मर्यादित वेळेसाठी झोपी जातात. विमान उड्डाणाचा ताण आणि उड्डाणाच्या अनियमित वेळा यामुळे या वैमानिकांचे झोपेचे चक्र बिघडल्याचे सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डाण संघटनेच्या म्हणण्यानुसार वैमानिकांना थकवा जाणवतो. मानसिक ताण येतो. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अशाच कारणामुळे 2010 मध्ये मंगळूर येथे विमान अपघात होऊन त्यात 158 जणांचा मृत्यू झाला होता. एकूण 74 टक्के वैमानिक सकाळच्या विमान उड्डाणाच्या सेवेत असतात. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. बरेचसे वैमानिक रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान जागे होतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे घड्याळ पूर्णपणे विस्कळीत होते.
गाढ झोपेची हीच खरी वेळ असते. त्यावेळी झोप न मिळाल्याने त्याचा परिणाम दिवसा झोपण्यात होतो. त्याचबरोबर वैमानिकांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या दिसून येतात. अनेक वैमानिकांना 10 ते 12 तास काम करावे लागते. त्यामुळेही त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

Back to top button