नवी मुंबई : कोपरखैरणे बोनकोडे गावात ४ मजली इमारत कोसळली | पुढारी

नवी मुंबई : कोपरखैरणे बोनकोडे गावात ४ मजली इमारत कोसळली

नवी मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा कोपरखैरणे बोनकोडे गावात काल (शनिवार) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास धोकादायक असलेली चार मजली इमारत कोसळली. शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा काही भाग ढासळत असल्याचे लक्षात येताच इमारत खाली करण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत कोसळली. दरम्‍यान आज (रविवार) सकाळी या ढिगा-याखाली एक मृतदेह मिळून आला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईत यावर्षी 163 धोकादायक इमारती जाहीर केल्या होत्या. त्या इमारती खाली करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र इमारत मालकांकडून अजूनही इमारती खाली करण्यात आल्या नाहीत.

बोनकोडे गावातील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला. सकाळ पासून या इमारतीचा काही भाग झुकल्याने येथे राहणाऱ्या काही कुटूंबांनी ही इमारत खाली करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा एक भाग कोसळला. तात्काळ अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन सर्च ऑपरेशन सुरू केले.

2007 साली या इमारतीचं बांधकाम असून, 34 कुटुंब येथे वास्तव्यास होती. इमारतींमधील सर्व रहिवाशी सुखरूप आहेत. सर्च मोहीम थांबविण्यात आली असून, सकाळी पुन्हा ढिगारा हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. इमारती मधील रहिवाशींना महापालिका शाळेत हलवल्‍याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने ही इमारत कोसळली आहे. गावठाण विभागात आशा धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणात असून, या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्‍यान घटनास्थळी शोध व बचाव कार्य करताना एक व्यक्ती मृत अवस्थेत सापडला. प्रियावर्त सर्वेश्वर दत्त वय अंदाजे 31 वर्षे असे त्याचे नाव आहे.

याआधी नेरूळ, सेक्टर 17, जिमी पार्क 1 सोसायटी, प्लॉट 182 D येथे बिल्डिंगचे सहाव्या मजल्यापासून‌ 5 स्लॅब कोसळले होते. या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले होते. एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली आढळून आला होता.

हेही वाचा :  

Back to top button