मुंबई : महापालिका, बेस्ट कर्मचार्‍यांना 22 हजार 500 रुपयांचा बोनस | पुढारी

मुंबई : महापालिका, बेस्ट कर्मचार्‍यांना 22 हजार 500 रुपयांचा बोनस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना तब्बल 22 हजार 500 रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई पालिकेचे 93 हजार कर्मचारी, कामगार व अधिकारी आणि बेस्टचे 29 हजार कर्मचार्‍यांना हा बोनस मिळणार असून, त्यांची
दिवाळी यंदा दणक्यात साजरी होईल. पालिकेच्या तिजोरीवर मात्र या बोनसचा भार तब्बल 225 कोटी रुपयांपेक्षा अधिक पडेल.
दिवाळीपूर्वीच हा बोनस बँकेमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेने 20 हजार रुपये बोनस देण्याची तयारी दर्शवली होती, तर कामगार संघटनेच्या कृती समितीने 25 हजार रुपयांचा बोनस मागितला होता. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या बुधवारच्या बैठकीत हा तिढा सुटला नाही. परिणामी, गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार नेते व पालिका प्रशासन यांची बैठक होऊन 22 हजार 500 रुपयांच्या बोनसवर शिक्कामोर्तब झाले. आनंदात दिवाळी साजरी करा आणि मुंबईकरांसाठी मनापासून काम करा, असे आवाहन मुख्यमंत्री
शिंदे यांनी यावेळी पालिका आणि बेस्ट कर्मचार्‍यांना केले.

अडीच हजारांची वाढ

2020 मध्ये पालिकेने 15 हजार 500 रुपये बोनस दिला होता. 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. यंदा सारे उत्सव जल्लोषात सुरू असताना त्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अडीच हजार रुपयांची वाढ केली.

शिक्षकांना प्रथमच बोनस

पालिकेच्या मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही यंदा प्रथमच 22 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार आहे. आतापर्यंत अन्य कर्मचार्‍यांच्या बोनसच्या 50 टक्के बोनस त्यांना मिळत होता. गेल्या वर्षी 10 हजार रुपये म्हणून मिळाला होता.

आरोग्य सेविकांनाही भाऊबीज

आरोग्य सेविकांनाही भाऊबीज भेट म्हणून 9 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. 2020 मध्ये आरोग्य सेविकांना 5 हजार 300
रुपये भाऊबीज भेट देण्यात आली होती.

Back to top button